Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedयोग्य संस्कारानेच सर्वांगीण विकास माताजी स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती : सायली अगावणे, आर्यन...

योग्य संस्कारानेच सर्वांगीण विकास माताजी स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती : सायली अगावणे, आर्यन राठोड यांना यंदाचा कसबा गौरव पुरस्कार प्रदान : कसबा संस्कार केंद्राचा ४१ वा वर्धापनदिन

पुणे : एखादी चांगली गोष्ट सातत्याने करायची असेल तर त्यासाठी सुसंस्कारांची गरज असते. प्राचीन हिंदू संस्कृतीमध्ये संस्कार देणाऱ्या तीन प्रमुख व्यक्ती आहेत माता, पिता आणि शिक्षक. आज आई-वडील स्वतः संस्कारित आहेत की नाही, हे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. कुटुंबव्यवस्था भक्कम असणे आवश्यक आहे. जन्माने सगळेच क्षुद्र असतात; परंतु त्यांच्यावर योग्य संस्कार झाले की त्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत माताजी स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.

 

श्रुतीसागर आश्रम फुलगांव पुणे संचलित कसबा संस्कार केंद्राच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात यंदाचा कसबा गौरव पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नृत्यांगना सायली अगावणे, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आर्यन राठोड यांना प्रदान करण्यात आला. सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला.

 

कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते डॉ.मिलिंद भोई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कसबा नगर संघप्रमुख डॉ.दीपक रोकडे, केशव शंखनाद पथक संस्थापक नितीन महाजन, कल्पना जाधव, संदीप लचके, सीमा सरदेशपांडे, किरण सरदेशपांडे, मुरलीधर देशपांडे, प्रल्हाद गवळी, शिरीष मोहिते, आनंद सराफ, पियुष शहा, गिरीश पोटफोडे, संगिता ठकार, केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवाणजी व अनघा दिवाणजी,सहाय्यक सहकारी वसुधा वडके, अपेक्षा राऊत, प्रीती नायकवडी, आर्या परदेशी चैत्राली सरमहाले उपस्थित होते.

 

कार्यक्रमात कसबा कार्य गौरव पुरस्कार पत्रकार सारिका रोजेकर आणि नाट्य प्रशिक्षक अमृता जोगदेव यांना तसेच बाल गौरव पुरस्कार आहान मोदी व जिम्नॅस्टिक्स खेळाडू अहिल्या आदमणे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. तसेच चैतन्य हास्ययोग मंडळ, त्वष्टा कासार समाज वाचन मंदिर, लेखक रविंद सातपुते आणि मॉडेल कॉलनीतील अजिंक्य मित्र मंडळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेतर्फे दरवर्षी उदयोन्मुख युवा वर्गाला प्रोत्साहन देण्याकरिता गौरविण्यात आले.

 

माताजी स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती म्हणाल्या, आज समाजकारण आणि धर्मकारण एकत्र जाण्याची आवश्यकता आहे. रामायण आणि महाभारत यांसारखे ग्रंथ कसे वागावे हे शिकवतात, त्याचबरोबर कसे वागू नये हेदेखील शिकवतात.

 

डॉ. मिलिंद भोई म्हणाले, अनुभूतीशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. खरी अनुभूती साधनेतून मिळते आणि साधना कशाची करावी, याचे मार्गदर्शन संस्कारांमधून मिळते. हे संस्कार घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य गुरू करतात. जीवनाला योग्य दिशा देणारा आणि मूल्यांची जाणीव करून देणारा गुरू लाभला, तर व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य घडते. त्यामुळे गुरूचे स्थान जीवनात अनन्यसाधारण आहे, असेही त्यांनी सांगितले. संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यांचा पारितोषिक वितरण विविध गुणदर्शन कार्यक्रम देखील झाला.

 

————————————

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments