पुणे, दि. 4 (जिमाका, वृत्तसेवा) : पिंपरी-चिंचवड येथील मोशी प्राधिकरण परिसरातील 250 मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सन 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसी, अपंग व अनाथ प्रवर्गातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थिनींना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.
इच्छुक विद्यार्थिनींनी दि. 15 जुलै 2026 पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत. वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य भत्ता, गणवेश भत्ता, प्रोजेक्ट भत्ता, तसेच संगणक, ग्रंथालय, क्रीडा व मनोरंजन सुविधा उपलब्ध आहेत.
प्रवेशासाठी विद्यार्थिनी बाहेरगावची असून पुणे, पिंपरी-चिंचवड किंवा मोशी परिसरातील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असणे आवश्यक आहे. अर्जासोबत गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बोनाफाईड, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड व रेशनकार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
गरजू व होतकरू विद्यार्थिनींनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृह प्रशासनाने केले आहे.
000


