Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedनारायण सेवा संस्थानतर्फे पुण्यात मेगा मोफत दिव्यांग सेवा शिबिराचे यशस्वी आयोजन; शेकडो...

नारायण सेवा संस्थानतर्फे पुण्यात मेगा मोफत दिव्यांग सेवा शिबिराचे यशस्वी आयोजन; शेकडो दिव्यांगांना लाभ

 

पुणे, महाराष्ट्र | ०५ जुलै २०२६: दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या नारायण सेवा संस्थान (NSS) ने टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस आणि न्यूमॅन अँड एस्सार ग्रुप यांच्या सहकार्याने रविवारी पुण्यातील अल्प बचत भवन येथे मेगा मोफत दिव्यांग तपासणी, करेक्टिव्ह सर्जरी निवड व 3D प्रिंटेड नारायण मॉड्युलर कृत्रिम अवयव मापन शिबिराचे यशस्वी आयोजन केले.

या शिबिराला दिव्यांग बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ३९६ दिव्यांग लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. अनुभवी अस्थिरोगतज्ज्ञ, कृत्रिम अवयव तज्ज्ञ आणि पुनर्वसन तज्ज्ञांच्या पथकाने सर्व लाभार्थ्यांची सखोल वैद्यकीय तपासणी केली. तपासणीनंतर ३९६ लाभार्थ्यांचे जपानी आणि जर्मन तंत्रज्ञानावर आधारित 3D प्रिंटेड नारायण मॉड्युलर कृत्रिम अवयव व कॅलिपर्ससाठी मोजमाप करण्यात आले, तर २२ लाभार्थ्यांची मोफत करेक्टिव्ह शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. या शस्त्रक्रिया नारायण सेवा संस्थानतर्फे पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून, त्यामुळे त्यांच्या हालचालींमध्ये आणि जीवनमानात लक्षणीय सुधारणा होणार आहे.

जपानी आणि जर्मन तंत्रज्ञानावर आधारित 3D प्रिंटेड नारायण मॉड्युलर कृत्रिम अवयव हे हलके, टिकाऊ, अत्यंत अचूक आणि वापरण्यास आरामदायी आहेत. हे कृत्रिम अवयव लाभार्थ्यांना अधिक गतिशीलता, कार्यक्षमता आणि स्वावलंबन मिळवून देण्यासाठी विकसित करण्यात आले आहेत. पुढील दोन ते तीन महिन्यांत निर्मिती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या पुढील शिबिरात हे कृत्रिम अवयव लाभार्थ्यांना मोफत बसवून देण्यात येतील.

शिबिराचे उद्घाटन डॉ. रघुनाथ कुचिक, महाराष्ट्र शासनाचे माजी मंत्री व भारतीय कामगार सेनाचे महासचिव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी नारायण सेवा संस्थानच्या मानवतावादी कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “दिव्यांगांची सेवा हीच खरी मानवसेवा आहे.” पुनर्वसन आणि सक्षमीकरणाच्या क्षेत्रात संस्थेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची त्यांनी प्रशंसा केली तसेच समाजाने अशा सेवाभावी उपक्रमांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहनही केले.

या कार्यक्रमाला मन्नू सिंग, व्हाइस प्रेसिडेंट, टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस; हेमंत बोरहाडे, चीफ फायनान्स कंट्रोलर, न्यूमॅन अँड एस्सार ग्रुप इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लि.; राहुल बोहरा, फाउंडर चेअरमन, रामा हॉस्पिटॅलिटी; प्रफुल्ल सारडा, फाउंडर चेअरमन, रुची क्रिएशन; संकेत शाह, अध्यक्ष, डिव्हाईन जैन ग्रुप; मनोज अग्रवाल, अध्यक्ष, अग्रवाल समाज, येरवडा; कर्नल अमरेंद्र पांडे; प्रशांत पांडे; अविनाश साळवे, नगरसेवक, येरवडा; तसेच महेश जिंदाम, मॅनेजिंग डायरेक्टर, न्यूसॉफ्ट सोल्यूशन्स प्रा. लि. यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना नारायण सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल म्हणाले, “मेगा मोफत दिव्यांग सेवा शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा सर्वांसाठी सुलभ आरोग्यसेवा आणि पुनर्वसन सुविधांची वाढती गरज अधोरेखित करतो. प्रत्येक गरजू दिव्यांग व्यक्तीपर्यंत पोहोचून आधुनिक वैद्यकीय सेवा, सहाय्यक साधने आणि पुनर्वसन सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या आयुष्यात गतिशीलता, सन्मान, आत्मविश्वास आणि नव्या आशेचा संचार करणे, यासाठी नारायण सेवा संस्थान कटिबद्ध आहे.”

शिबिराची माहिती देताना नारायण सेवा संस्थानचे ट्रस्टी-डायरेक्टर देवेंद्र चौबीसा यांनी संस्थेच्या विविध मानवतावादी उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, “आमचे ध्येय केवळ वैद्यकीय उपचारापुरते मर्यादित नसून दिव्यांगांचे सर्वांगीण पुनर्वसन आणि सामाजिक सक्षमीकरण हे आहे. मोफत करेक्टिव्ह शस्त्रक्रिया, नारायण कृत्रिम अवयव, शिक्षण, कौशल्य विकास, स्वयंरोजगार प्रशिक्षण, दररोज सुमारे ५,००० गरजूंना अन्नदान, वंचित मुलांसाठी नारायण चिल्ड्रन्स अकादमी तसेच दिव्यांगांसाठी सामूहिक विवाह यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे आम्ही सन्मान आणि संवेदनशीलतेने जीवन बदलण्याचा प्रयत्न करत आहोत.”

शिबिरादरम्यान उपस्थित मान्यवरांनी लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला तसेच वैद्यकीय तपासणी, कृत्रिम अवयव निर्मिती आणि पुनर्वसनाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली. संस्थेतर्फे सर्व लाभार्थी आणि त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांसाठी मोफत भोजन, अल्पोपहार आणि चहाची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे ४० स्वयंसेवक आणि तज्ज्ञांच्या समर्पित पथकाने शिबिराचे यशस्वी आयोजन सुनिश्चित केले.

नारायण सेवा संस्थान मोफत करेक्टिव्ह शस्त्रक्रिया, आधुनिक कृत्रिम अवयव, पुनर्वसन सेवा, शिक्षण, कौशल्य विकास आणि विविध मानवतावादी उपक्रमांद्वारे दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहे. पुण्यातील हे शिबिर संस्थेच्या सेवाभाव, करुणा आणि आधुनिक पुनर्वसन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जीवन परिवर्तनाच्या ध्येयातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरले आहे.

संस्थेच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावरही सर्वोच्च गौरव मिळाला आहे. संस्थेचे संस्थापक कैलाश मानव अग्रवाल यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल २००८ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच सेवाभावी परंपरेला पुढे नेत नारायण सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांना २०२३ मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांगांच्या सक्षमीकरणातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. १९८५ मध्ये स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेने ३९,३८८ हून अधिक लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयव उपलब्ध करून दिले असून, ४.५२ लाखांहून अधिक दिव्यांगांना मोफत वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसन सेवा प्रदान केल्या आहेत. त्यामुळे नारायण सेवा संस्थान हे भारतातील दिव्यांग पुनर्वसन आणि मानवतावादी सेवेसाठी कार्य करणाऱ्या अग्रगण्य संस्थांपैकी एक म्हणून ओळ

खले जाते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments