Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedआशा कार्यकर्त्यांच्या सेवाभावी कार्याचा मेडिकव्हर हॉस्पिटलकडून सन्मान

आशा कार्यकर्त्यांच्या सेवाभावी कार्याचा मेडिकव्हर हॉस्पिटलकडून सन्मान

 

 

पिंपरी- चिंचवड : समाजाच्या आरोग्यसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या आशा कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मेडिकव्हर हॉस्पिटल, भोसरी यांच्या वतीने ‘आशा कार्यकर्ती सन्मान सोहळा’ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड परिसरातील ३५० हून अधिक आशा कार्यकर्त्या व टीम लीडर्स मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

 

या कार्यक्रमाला सौ. नम्रताताई योगेश लोंढे (नगरसेविका, इंद्रायणी नगर), सौ. चंद्राबाई कांबळे (अध्यक्षा, युनियन ऑफ अॅक्रेडिटेड सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्ट, पिंपरी-चिंचवड), सौ. सुप्रियाताई महेश चांडगुडे (नगरसेविका, शाहूनगर), सौ. आशा आहेर (उपाध्यक्षा, युनियन ऑफ अॅक्रेडिटेड सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्ट) तसेच सौ. गौरी गोळे (सचिव, भोसरी) प्रमुख उपस्थित होत्या.

 

यावेळी आरोग्य जनजागृती, लसीकरण, माता-बाल आरोग्य, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि नागरिकांना आरोग्य सुविधांशी जोडण्यामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आशा कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच सौ. प्रियंका फटिंग (यमुना नगर), सौ. संगीता मोरे (जिजामाता हॉस्पिटल), सौ. सुनीता अंकुश (सांगवी), सौ. वंदना जावरे (तेलारा हॉस्पिटल) आणि सौ. अम्रपाली फुले (थेरगाव) या आशा टीम लीडर्सचाही विशेष सन्मान करण्यात आला.

 

कार्यक्रमात मेडिकव्हर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध आरोग्य विषयांवर मार्गदर्शन केले. आशा कार्यकर्त्यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना अधिक प्रभावीपणे समुदायात आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी प्रेरित करण्यात आले. यानंतर सन्मानचिन्ह वितरण, प्रेरणादायी संवाद आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.

 

याप्रसंगी मेडिकव्हर हॉस्पिटलच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “आशा कार्यकर्त्या या ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्या अथक परिश्रमामुळे आरोग्य सेवा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत आहे. त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करणे ही आमची सामाजिक बांधिलकी आहे.”

 

या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून मेडिकव्हर हॉस्पिटलने समुदाय आरोग्य बळकट करण्यासाठी आशा कार्यकर्त्यांबरोबरचे सहकार्य अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments