पुणे, 13 जुलै 2026 : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या मार्गदर्शनाखाली, बीएसईने प्रमुख मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन (एमआयआय ) म्हणून वार्षिक पंढरपूर वारीदरम्यान प्रथमच गुंतवणूकदार जनजागृती उपक्रम यशस्वीपणे राबवला. 9 आणि 10 जुलै रोजी पुण्यातील सहा महत्त्वाच्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचा उद्देश आर्थिक साक्षरता, स्कॅमबाबत जनजागृती, सायबर सुरक्षा आणि योग्य गुंतवणूक करण्याची जागरूकता निर्माण करणे हा होता. अंदाजे 6–8 लाख वारकरी या मार्गावरून जात असल्याने, भक्तगण आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत गुंतवणूकदार जनजागृती संदेश पोहोचवण्याची ही एक अनोखी संधी ठरली. विशेषतः ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागातील सहभागी लोकांपर्यंत आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूकदार जनजागृती पोहोचवण्यावर भर देण्यात आला.
हा दोन दिवसांचा उपक्रम बीएसई इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड (आयपीएफ ) ने इतर एमआयआय आणि असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (एएमएफआय ) यांच्या सहकार्याने आयोजित केला.
या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘पथ नाट्य’ (स्ट्रीट प्ले) होता. यात सायबर फसवणूक, आर्थिक घोटाळे, डिजिटल सुरक्षा आणि योग्य गुंतवणूक याबाबत महत्त्वाचे संदेश सोप्या पद्धतीने सादर करण्यात आले. गुंतागुंतीचे आर्थिक विषय सहज आणि आकर्षक पद्धतीने मांडल्यामुळे या नाट्यप्रयोगांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.
सेबी चे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये कार्यकारी संचालक श्री सुनील कादम, मुख्य सरव्यवस्थापक श्री विकास एस.एस., उप सरव्यवस्थापक श्रीमती बाला कुमारी आणि सहाय्यक सरव्यवस्थापक श्री राहुल केलापुरे, यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला आणि गुंतवणूकदार जनजागृती व आर्थिक साक्षरता उपक्रम अधिक मजबूत करण्याबाबत सहभागी संस्थांना मार्गदर्शन केले
.


