Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedम्हात्रे पूल येथील ओपन जिम कामासंदर्भात समाज माध्यमावर प्रसारित माहिती तथ्यहीन-जिल्हा सह...

म्हात्रे पूल येथील ओपन जिम कामासंदर्भात समाज माध्यमावर प्रसारित माहिती तथ्यहीन-जिल्हा सह आयुक्त मच्छिंद्र घोलप*

 

 

पुणे, दि. 13: पुणे महानगरपालिका क्षेत्रातील म्हात्रे पूल परिसरात ओपन जिम उभारण्याच्या कामाचा समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये विकासकामाच्या माहिती फलकावरील माहितीचा चुकीचा अर्थ लावून संबंधित कामाबाबत तसेच शासनाच्या निधीबाबत दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे. या माहिती वस्तुस्थितीशी विसंगत असून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे, अशी माहिती नगरपालिका प्रशासन शाखेचे -जिल्हा सह आयुक्त मच्छिंद्र घोलप यांनी दिली आहे.

 

समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये प्रभाग क्र. 13 मधील ‘म्हात्रे पूल रिलायन्स मॉल शेजारी ओपन जिम बसविणे’ या विकासकामाचा उल्लेख करण्यात आला आहे. संबंधित कामास रु. 9,80,744/- (अक्षरी रुपये नऊ लाख ऐंशी हजार सातशे चव्वेचाळीस फक्त) इतकीच प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात आलेली असून, कामाची मंजूर किंमत याच मर्यादेत आहे.

 

मात्र, कामाच्या फलकावर नमूद असलेल्या “42170541” या क्रमांकाचा चुकीचा अर्थ लावून, या एकाच कामासाठी 42 कोटी रुपये अथवा कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, असा दावा समाज माध्यमावर करण्यात येत आहे. हा दावा पूर्णतः चुकीचा व वस्तुस्थितीविरुद्ध आहे.

 

*वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे:*

‘42170541’ हा निधीचा आकडा नसून शासकीय लेखाशीर्ष (Budget Head) आहे. शासनाच्या अर्थसंकल्पीय व लेखा प्रणालीमध्ये प्रत्येक विभाग, योजना किवा खर्चाच्या प्रकारासाठी स्वतंत्र सांकेतिक क्रमांक (लेखाशीर्ष) निर्धारित करण्यात आलेला असतो. संबंधित कामासाठी नमूद केलेले “4217 0541” हे नगर विकास विभागाचे अधिकृत लेखाशीर्ष असून, तो केवळ लेखावर्गीकरणासाठी वापरला जाणारा तांत्रिक क्रमांक आहे. त्याचा कोणत्याही कामाच्या मंजूर रकमेशी अथवा खचांशी संबंध नाही.

 

संबंधित कामाची मंजूर किंमत रु. 9,80,744 इतकीच आहे. म्हात्रे पूल परिसरात ओपन जिम उभारण्याच्या कामासाठी केवळ 9,80,744 रुपये इतकाच निधी मंजूर करण्यात आला असून, त्यानुसारच कामाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रचलित शासन नियमांनुसार ई-निविदा प्रक्रियेद्वारे पूर्ण पारदर्शकतेने करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय लेखाशीर्षाचा चुकीचा अर्थ लावून कोट्यवधी रुपयांच्या मंजूरीबाबत करण्यात येत असलेला प्रचार हा वस्तुस्थितीविरुद्ध, दिशाभूल करणारा व तथ्यहीन आहे, अशी माहिती श्री. घोलप यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments