पुणे : संजीव सोशल फाउंडेशनतर्फे संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त सलग दुसऱ्या वर्षी ‘वारकरी सेवा अभियान आयोजित करण्यात आले होते. उपक्रमात हजारो वारकरी बांधवांनी विविध नि:शुल्क सेवांचा लाभ घेतला. अभियानांतर्गत बूट व चप्पल दुरुस्ती, बॅग दुरुस्ती, पायांची मालिश, महिला आराम कक्ष तसेच फराळ व दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. स्वयंसेवकांनी सेवाभावाने वारकऱ्यांची सेवा केली.
या सेवायज्ञास जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या दहाव्या पिढीतील वंशज ह.भ.प. मुकुंद महाराज मोरे, ह.भ.प. नितीन महाराज मोरे तसेच ह.भ.प. सुप्रिया ताई साठे यांची उपस्थिती लाभली. यावेळी पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. विक्रमसिंह उमराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण दत्तात्रय मोरे, ह.भ.प. उमेश सुरेश मोरे, अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर विश्वनाथ मोरे तसेच विश्वस्त ह.भ.प. गणेश उत्तम मोरे, ह.भ.प. वैभव अशोक मोरे आणि ह.भ.प. दिलीप नारायण मोरे उपस्थित होते.
छाया संजीव गदादे म्हणाल्या, वारकरी बांधवांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांच्या मुखातून मिळणारे आशीर्वाद हीच आमच्या सेवाकार्यातील खरी कमाई आहे. वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा सेवायज्ञ यशस्वी झाला. भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात आणि अधिक सेवाभावाने हे अभियान सुरू ठेवण्याचा आमचा संकल्प आहे.
या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी संजीव सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी मुळे या उपक्रमाचे वारकरी बांधव व मान्यवरांनी कौतुक केले.


