कंपनीच्या संचालक मंडळाने 4,000 कोटीं रुपयांपर्यंत निधी उभारण्यास मंजुरी दिली.
गोल्ड लोन व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना; या आर्थिक वर्षात 200 शाखा सुरू करण्याचे लक्ष्य.
मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेडने 30 जून 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत चांगली कामगिरी नोंदवली आहे. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा मागील वर्षाच्या तुलनेत 67 टक्क्यांनी वाढून 461 कोटी झाला आहे. मालमत्ता व्यवस्थापनातील वाढ (एयूएम), एआय तंत्रज्ञानाचा वापर, रिटेल कर्ज वितरणात झालेली वाढ आणि कर्जाच्या गुणवत्तेतील स्थिरता यामुळे ही वाढ झाली आहे.
कंपनीच्या रिटेल कर्ज वितरणात मागील वर्षाच्या तुलनेत 44 टक्क्यांनी वाढ झाली असून ते 12,527 कोटीं रुपयांवर पोहोचले आहे. यावरून ग्राहकांकडून कर्जाची वाढती मागणी आणि व्यवसायातील सातत्यपूर्ण वाढ दिसून येते. कंपनीची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) 25 टक्क्यांनी वाढून 1.07 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर रिटेल एयूएम मध्ये 32 टक्क्यांची वाढ होऊन ती 91,249 कोटीं रुपये झाली आहे. याशिवाय, कंपनीच्या संचालक मंडळाने भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहून 4,000 कोटीं रुपयांपर्यंत निधी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
मजबूत कामगिरीबद्दल बोलताना पिरामल फायनान्स लिमिटेडचे अध्यक्ष आनंद पिरामल म्हणाले,
“पिरामल फायनान्स ही भारताच्या उच्चस्तरीय एनबीएफसी कंपन्यांमधील सर्वात नवीन कंपनी असली तरी, आम्ही देशभरातील जवळपास 60 लाख ग्राहकांना सेवा देणारे विविध प्रकारचे रिटेल फायनान्स नेटवर्क उभे केले आहे. आमच्या प्रत्यक्ष शाखांच्या मोठ्या नेटवर्कसोबतच प्रत्येक कामकाजात तंत्रज्ञान आणि एआयचा वापर करून आम्ही ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्यास सक्षम झालो आहोत.
मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 276 कोटीं रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला होता. कंपनीने देशभरातील आपले नेटवर्क वाढवत 26 राज्यांमधील 607 शहरांमध्ये 780 शाखा सुरू केल्या आहेत. तसेच, कंपनीच्या ग्राहक संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत 24 टक्क्यांची वाढ होऊन ती 60 लाखांवर पोहोचली आहे. यामुळे भारतातील कंपनीची उपस्थिती आणखी मजबूत झाली आहे.
कंपनीने सांगितले की, गोल्ड लोन व्यवसायावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीमध्ये पिरामल फायनान्सने 6 कोटीं रुपयांचे गोल्ड लोन वितरित केले आहे. गोल्ड लोन व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कंपनीने या आर्थिक वर्षात देशभरात सुमारे 200 नवीन गोल्ड लोन शाखा सुरू करण्याची योजना आखली आहे. हा कंपनीच्या गोल्ड लोन व्यवसाय वाढवण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वाचा भाग आहे.


