Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedशनिवार-रविवारी मिक्सर (RMC) वाहनांना दिवसा प्रवेशास परवानगी*

शनिवार-रविवारी मिक्सर (RMC) वाहनांना दिवसा प्रवेशास परवानगी*

 

 

 

पुणे, दि. २८ (जिमाका): पुणे शहरातील वाहतुकीचे प्रभावी नियोजन, संभाव्य वाहतूक कोंडी टाळणे तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या रेडी मिक्स काँक्रीट (RMC) मिक्सर वाहनांच्या वाहतुकीबाबत प्रायोगिक स्वरूपात नवीन वाहतूक नियमन लागू करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिसूचना तसेच मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील संबंधित तरतुदींनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी हा आदेश निर्गमित केला आहे.

 

 

या आदेशानुसार, पुणे शहरातील सुरू असलेल्या बांधकामांसाठी आवश्यक असलेल्या मिक्सर (RMC) वाहनांना शनिवार व रविवार सकाळी ६.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत रेड झोनसह पुणे शहर हद्दीत कोणतीही आगाऊ परवानगी न घेता प्रवेश व वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी केवळ मिक्सर (RMC) वाहनांसाठी लागू असून, जेसीबी, रोड रोलर, ट्रॅक्टर, इतर स्लो-मुव्हिंग वाहने तसेच मालवाहू जड वाहनांना या आदेशाचा लाभ लागू होणार नाही.

 

 

हा आदेश प्रायोगिक स्वरूपात लागू करण्यात आला असून, वाहतुकीची परिस्थिती, सार्वजनिक हित व प्रशासकीय गरज लक्षात घेऊन त्यामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा किंवा फेरबदल करण्यात येऊ शकतात.

 

 

दरम्यान, मिक्सर (RMC) वाहनांवर चालकांना सहाय्यभूत ठरणारी ३६० अंश कॅमेरा प्रणाली, बॅक कॅमेरा, रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखी सुरक्षा उपकरणे बसविणे किंवा वाहनासोबत क्लिनर अथवा चालक सहाय्यक ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक RMC प्लांटमध्ये डी.डी. मशीन उपलब्ध ठेवून, प्लांटमधून वाहन बाहेर पडण्यापूर्वी त्याची तपासणी करणे आवश्यक राहणार आहे.

 

 

या अधिसूचनेत हायवा, डंपर, ट्रक आदी इतर जड वाहनांच्या वाहतुकीत कोणतीही शिथिलता अथवा बदल करण्यात आलेला नाही.

 

 

सर्व संबंधित कंत्राटदार, विकासक, वाहनमालक, वाहनचालक तसेच संबंधित आस्थापनांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोटार वाहन अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच इतर लागू कायद्यांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments