लायन्स क्लब ऑफ पुना सिटी, श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि घोलप ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थिनींमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने ‘महा संकल्प २०२६’ या उपक्रमांतर्गत पुणे शहरातील विविध शैक्षणिक संकुलांमधील सुमारे ५१ हजार विद्यार्थिनींची मोफत हिमोग्लोबिन तपासणी, आरोग्य तपासणी आणि आरोग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न विधी महाविद्यालय, गणेशखिंड येथे झाला.
लायन्स क्लब ऑफ पुना सिटी, श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि घोलप ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून उद्घाटन लायन्स क्लब इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ श्रेयस दीक्षित यांच्या हस्ते झाले.
यावेळी डॉ. अनन्या बिबवे, प्राचार्या, मॉडर्न विधी महाविद्यालय, ज्योत्स्ना एकबोटे, सहसचिव, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, दीपक थोरात, अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ पुना सिटी, दिलीप थोरात, उपाध्यक्ष, दिलीप बांदल, सचिव, बजरंग आकडे, खजिनदार, अमर लांडे, सहसचिव, श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टचे विश्वस्त, रोहिदास घोलप तसेच घोलप ब्लड सेंटरचे अधिकारी, कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे स्वयंसेवक उपस्थित होते.
उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन, बोन डेन्सिटी, नेत्र आणि दंत तपासणी मोफत करण्यात आली. तसेच आरोग्य संवर्धन, संतुलित आहार आणि रक्तक्षय प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहसचिव ज्योत्स्ना एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांपासून महिला व विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी आणि रक्तदान उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून विद्यार्थिनींचा रक्तदानातील सहभाग वाढवून सकारात्मक सामाजिक उदाहरण निर्माण करण्यात आले आहे.
दीपक थोरात आणि दिलीप बांदल म्हणाले, आगामी काळात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सर्व महाविद्यालयांमध्ये तसेच विविध शैक्षणिक संकुलांमध्ये हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पुना सिटी यांच्या देणगी सहयोगातून महाराष्ट्रात प्रथमच ब्लड बँकेसाठी ‘एजीचेक’ नॉन-इन्व्हेसिव्ह हिमोग्लोबिन स्क्रीनिंग डिव्हाइस प्रदान करण्यात आले. या उपकरणाच्या साहाय्याने केवळ बोटाच्या स्पर्शाने तात्काळ डिजिटल पद्धतीने हिमोग्लोबिन तपासणी करणे शक्य
होत आहे.


