नवी दिल्ली, ४ ऑगस्ट २०२६: मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडने (एमएफआरएल) प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे आयोजित एफ१® सिम रेसिंग इंडिया ओपन २०२६ टाईम ट्रायल्सचा दिल्ली टप्पा उत्साहात पूर्ण केला. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी या तीन दिवसीय कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवली. जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता असलेल्या भारतीय रेसिंग गुणवत्तेचा शोध घेऊन त्यांना घडवणाऱ्या अशा उपक्रमांना त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला. व्यावसायिक एफ१® सिम्युलेटरवर ३,००० हून अधिक सहभागींनी आपल्या रेसिंग कौशल्याची चाचणी घेतली, तर अधिकृत पात्रता लीडरबोर्डवर ९४० नोंदींची नोंद झाली. या उत्स्फूर्त सहभागामधून देशात फॉर्म्युला १® ची वाढती लोकप्रियता दिसून आली.
शिवंश डी बिजॉय या १६ वर्षीय मुलाने मोंझा सर्किटवर १:२०.७५५ अशी वेळेची नोंद केली. यातील खरा अनपेक्षित धक्का म्हणजे ११ वर्षीय आरव गुप्ता याने १:२१.६७४ वेळेसह एकूण १० वे स्थान मिळवले, जे संपूर्ण स्पर्धेतील सर्वात वेगवान लॅपपेक्षा एका सेकंदापेक्षाही कमी वेळेच्या अंतरावर होते. ज्युनिअर श्रेणीतील एकूण सहा ड्रायव्हर्सनी एकूण अव्वल २० मध्ये स्थान मिळवले.
या प्रसंगी मत व्यक्त करत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे म्हणाल्या, “मोटरस्पोर्ट्सचे स्वरूप बदलत आहे आणि त्यासोबतच विजेते (चॅम्पियन्स) घडवण्याची पद्धतही बदलत आहे. सिम रेसिंग हे केवळ गेमिंग नसून एक अत्यंत वास्तववादी व्हर्च्युअल मोटरस्पोर्ट आहे, ज्याचा वापर व्यावसायिक रेसिंग टीम्स आणि ड्रायव्हर्स प्रशिक्षणासाठी करतात. तसेच ते जागतिक ई-स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म म्हणूनही काम करते. खेळ आणि तंत्रज्ञान एकत्रित येऊन भविष्य कसे घडवत आहेत, याचे हे उत्तम उदाहरण आहे.”
मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अमित गढोक म्हणाले, “दिल्लीतून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यासोबत केंद्रीय मंत्री व राज्यमंत्र्यांची भेट यामुळे भारत मोटरस्पोर्ट्समध्ये नेतृत्व करण्यासाठी आणि फॉर्म्युला १ मध्ये आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहे या आमच्या विश्वासाला बळ मिळाले आहे. एक शाश्वत टॅलेंट श्रेणी तयार करणे आणि भारतातील ड्रायव्हर्सना मुख्य ग्रिडवर (स्पर्धेत) स्थान मिळवून देणे ही आमची संकल्पना आहे. चाहत्यांच्या तसेच धोरणकर्त्यांच्या पाठिंब्याने जागतिक ग्रिडपर्यंत मजल मारू शकणाऱ्या, भारताचे प्रतिनिधित्व करू शकणाऱ्या आणि देशाचे नाव उज्ज्वल करू शकणाऱ्या अनेक गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
ज्या सहभागींनी अधिकृत कट-ऑफ वेळ ओलांडली आहे त्यांनी झोनल क्वालिफायर्समध्ये थेट प्रवेश मिळवला आहे. मुंबईतील नॅशनल फायनलच्या दिशेने एफ१® सिम रेसिंग इंडिया ओपनच्या प्रवासातील हा पुढील टप्पा आहे. तसेच यामुळे मुंबई फाल्कन्स रेसिंगच्या वन इन अ बिलियन हंट – अगला स्टार ड्रायव्हर डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
येत्या काही आठवड्यांत झोनल क्वालिफायर्स सुरू होणार असून, राष्ट्रीय लीडरबोर्डवर दिल्लीने मोलाची भर घातली आहे, ज्यातून आधीच आशादायक चिन्हे दिसत आहेत. उच्च स्तरावर भारतातील फॉर्म्युला १ च्या भविष्याविषयी चर्चा सुरू असताना, एमएफआरएलचे मुख्य लक्ष मुलभूत गोष्टींवर केंद्रित आहे, ते म्हणजे, या तरुण ड्रायव्हर्सना लवकर शोधणे, खऱ्या मानकांवर त्यांची चाचणी घेणे आणि त्यांना या खेळात येण्यासाठी एक संरचित मार्ग प्रदान करणे.


