Wednesday, August 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedउपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते हॅकेथॉन २०२५च्या विजेत्यांचा करण्यात आला गौरव ...

उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते हॅकेथॉन २०२५च्या विजेत्यांचा करण्यात आला गौरव तरुणांच्या नवोन्मेषी कल्पनांचा झाला सन्मान

पिंपरी ५ ऑगस्ट २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हॅकेथॉन २०२५’ स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील उपमहापौर कार्यालयात उत्साहात पार पडला. शहराच्या विकासासाठी तंत्रज्ञानाधिष्ठित आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांना चालना देणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

स्पर्धेत समाधान नरळे यांनी प्रथम क्रमांक पटकावत रुपये २५ हजार रोख पारितोषिक स्वीकारले. करण कदम यांनी द्वितीय क्रमांक मिळवत रुपये १५ हजार, तर कु.मृण्मयी सावंत यांनी तृतीय क्रमांक मिळवत रुपये १० हजार रोख पारितोषिक मिळविले. द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्यावतीने त्यांच्या पालकांनी पारितोषिक स्वीकारले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या, “हॅकेथॉनसारख्या स्पर्धा या तरुणांच्या कल्पकतेला आणि तांत्रिक कौशल्याला दिशा देणारे प्रभावी व्यासपीठ आहे. शहराच्या विविध नागरी समस्यांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची क्षमता आपल्या युवकांमध्ये आहे. अशा स्पर्धांमुळे नवोन्मेषी विचारांना प्रोत्साहन मिळते आणि भविष्यातील सक्षम, स्मार्ट व नागरिकाभिमुख शहर उभारण्यास निश्चितच मदत होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भविष्यातही अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देईल.

या कार्यक्रमास नगरसेविका योगिता नागरगोजे, उपआयुक्त पंकज पाटील, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, दीपक पवार, रमेश आवटे, हेमंत घाडगे, उज्वला करपे, सुनीता चौगुले, संजय जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते मंगेश भालेराव आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच महापालिकेच्या विविध सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नागरिककेंद्रित नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments