Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedज्ञानसूर्य" पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) (दादा) यांना...

ज्ञानसूर्य” पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) (दादा) यांना शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात भावुक वातावरणात पार पडली शोकसभा

पिंपरी, पुणे: डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी येथे आज (१२ ऑगस्ट २०२६) सायंकाळी माजी राज्यपाल आणि डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून पाटील परिवाराचे सांत्वन केले व दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) दादांच्या निधनाने शिक्षणविश्वावर तीव्र शोककळा पसरली असून, एका महान युगाचा अंत झाला आहे. ज्ञान, संस्कार, दूरदृष्टी आणि मानवतेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे एक थोर शिक्षणमहर्षी म्हणून दादा ओळखले जात. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी केवळ शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे केले नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार दिला, नैतिक मूल्यांची जोपासना केली आणि शिक्षणाला खऱ्या अर्थाने समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनवले. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व, साधेपणा, मानवतावादी दृष्टिकोन आणि शिक्षणाप्रती असलेली अखंड निष्ठा येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी सदैव मार्गदर्शक ठरेल.
पाटील परिवाराकडून सांत्वनपर भेटीचा स्वीकार: याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती व ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या कुलपती व अध्यक्षा डॉ. सौ. भाग्यश्री पी. पाटील, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ), कोल्हापूरचे कुलपती व अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व आमदार श्री. सतेज डी. पाटील, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीचे प्र-कुलपती व डॉ. डी. वाय. पाटील युनीटेक सोसायटीचे सचिव डॉ. सोमनाथ पी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव डॉ. सौ. स्मिता जाधव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणेचे विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पी. पाटील यांच्यासह पाटील परिवारातील सदस्यांनी उपस्थितांच्या सांत्वनपर भेटींचा स्वीकार केला.
या शोकसभेला शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय, साहित्यिक, सामाजिक, क्रीडा, कृषी, अध्यात्मिक, शासकीय व वैद्यकीय क्षेत्रांतील असंख्य मान्यवर उपस्थित होते. तसेच शिक्षण समूहातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संपूर्ण विद्यापीठ सभागृह शोकाकुल वातावरणात बुडून गेले होते. उपस्थितांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या पवित्र स्मृतीस अत्यंत नम्रभावाने अभिवादन केले. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून शोक व्यक्त केला. त्यानंतर पवित्र गीता पठण, प्रार्थना आणि दादांच्या जीवनप्रवासावर आधारित भावस्पर्शी चित्रफीत (Short Film) दाखवली जात असताना सभागृहातील वातावरण पूर्णपणे गहिवरून गेले होते; उपस्थितांचे मन हेलावून गेले, डोळे अश्रूंनी पाणावले.

डॉ. पी. डी. पाटील (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे):
“दादा हे केवळ एका शैक्षणिक समूहाचे संस्थापक नव्हते, तर आम्हा सर्वांचे भक्कम आधारस्तंभ आणि मार्गदर्शक होते. ‘शिक्षणातून समाजविकास’ हा त्यांनी दिलेला मंत्र आणि त्यांनी जपलेली मूल्ये हीच आमची खरी पुंजी आहे. त्यांनी उभारलेला हा ज्ञानाचा वटवृक्ष असाच बहरत ठेवणे आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर निष्ठेने चालणे, हीच त्यांना दिलेली खरी आणि भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.”

डॉ. सौ. भाग्यश्री पी. पाटील (प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ व अध्यक्षा, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी):
“दादांचे संपूर्ण आयुष्य हे मानवता, वात्सल्य आणि निरंतर सेवेचे प्रतीक होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी, ही त्यांची धडपड असायची. त्यांची तीच दूरदृष्टी, साधेपणा आणि आपुलकी आजही आपल्या सर्वांच्या मनात जिवंत आहे. दादांचे विचार आणि त्यांचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहतील.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments