Thursday, August 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedपरमवंदनीय समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांच्या रजत पुण्यस्मृती वर्षानिमित्त ‘ब्लड इन नीड’...

परमवंदनीय समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांच्या रजत पुण्यस्मृती वर्षानिमित्त ‘ब्लड इन नीड’ सेवेचा देशभर विस्तार; १६ ऑगस्टला मोबाइल ॲपचे लोकार्पण*

पुणे : परमवंदनीय समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांच्या रजत पुण्यस्मृती वर्षानिमित्त ‘ब्लड इन नीड’ या मानवतावादी सेवेचा अखिल भारतीय विस्तार जाहीर करण्यात येणार आहे. यानिमित्त विकसित करण्यात आलेल्या ‘ब्लड इन नीड’ मोबाइल ॲपचे लोकार्पण रविवार, १६ ऑगस्ट रोजी पुण्यात करण्यात येणार आहे. अशी माहिती जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे विश्वस्त श्री. अर्जुन फुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी जगद्गुरू रामानंदाचार्य पीठाचे श्री. कमलाकर हजारे, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे प्रसिद्धी प्रमुख श्री. राजन बोडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून गेल्या अनेक वर्षांपासून ही सेवा कार्यरत आहे. २ ऑक्टोबर २०११ रोजी सुरू झालेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत २७ हजार २८८ हून अधिक गरजू रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सेवेमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यास मोलाची मदत झाली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या उद्देशाने मोबाइल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपद्वारे गरजू रुग्ण, रक्तदाते, स्वयंसेवक आणि रक्तपेढ्या यांच्यात तातडीने समन्वय साधता येणार असून, रक्ताच्या शोधासाठी होणारी धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुहास मोहनळकर, ROTO–SOTTO चे नोडल अधिकारी डॉ. आकाश शुक्ला, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ अभिनेते व पर्यावरण संवर्धक सयाजी शिंदे, ‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक (मल्टीमीडिया) अंकित काणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यात रक्तदान, देहदान, अवयवदान, विनामूल्य रुग्णवाहिका सेवा, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि शिक्षण आदी समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच ‘ब्लड इन नीड’ मोबाइल ॲपची प्रत्यक्ष माहिती व प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे.

मुख्य लोकार्पण सोहळा १६ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत महालक्ष्मी लॉन्स, पुणे-नगर रोड, खराडी बायपासजवळ, जुना जकात नाक्यासमोर, पुणे येथे होणार आहे.

या स्मृतिसोहळ्याची सुरुवात पहाटे काकड आरतीने होणार असून, त्यानंतर पादुकांची षोडशोपचार महापूजा, भजन, संत-महंत व मान्यवरांची समाजप्रबोधनपर प्रवचने, पादुकांची परिक्रमा आणि सांजआरती असे विविध कार्यक्रम होणार आहेत. रात्री जगद्गुरू श्रीमद्रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे मार्गदर्शनपर प्रवचन होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments