एक सक्षम व सर्वसमावेशक अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम उभारण्यासाठी कटिबद्ध – डॉ.दिलीप माने
· जो निर्णय घेतला तो योग्यच होता – अवयवदात्यांचे कुटुंबीय
पुणे,14 ऑगस्ट 2026 : जागतिक अवयवदान दिनानिमित्त नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे अवयवदाता कृतज्ञता सन्मान 2026 या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हडपसर येथील नोबल हॉस्पिटलमधील ऑडिटोरियम मध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात अवयवदात्यांचे स्मरण आणि त्यांच्या कुटुंबियांचे अनुभव कथन करण्यात आले. त्याचबरोबर एका दुसऱ्या कार्यक्रमात प्राप्तकर्त्यांचा सन्मान सोहळा पार पडला. यामध्ये प्रत्यारोपणानंतरही आपण सामान्य आयुष्य जगू शकतो याविषयी प्राप्तकर्त्यांनी आपले अनुभव सांगितले.
याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून झेडटीसीसी पुणेच्या समन्वयक आरती गोखले उपस्थित होत्या. यांसह नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने, उपव्यवस्थापकीय संचालक डॉ.दिविज माने,समूह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे,वरिष्ठ व्यवस्थापन सदस्य,कर्मचारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी अवयवदात्यांच्या कुटुंबियांनी त्या महत्त्वाच्या क्षणाबाबत आपले अनुभव सांगितले. आपल्या कुटुंबातील सदस्य आपल्या सोबत नसला तरी समाजात अजूनही जिवंत आहे.कोणाला तरी एक नवजीवन दिले आहे,याचे आम्हाला समाधान आहे.त्यामुळे आम्ही जो त्या क्षणी अवयवदानाचा निर्णय घेतला तो योग्यच होता ही भावना त्यांनी व्यक्त केली.
झेडटीसीसी पुणेच्या समन्वयक आरती गोखले म्हणाल्या की,12 एप्रिल 1997 साली झालेल्या पुण्यातील पहिल्या व महाराष्ट्रातील दुसऱ्या मेंदूमृत दात्याकडून झालेल्या अवयवदानाची मी साक्षीदार आहे.त्याकाळी रूग्णाच्या नातेवाईकांना मेंदूमृत ही संकल्पना समजून सांगणे खूप कठिण होते. अवयवदानाबाबतची जागरूकता समाजामध्ये रूजवायला खूप वेळ लागला. तरीदेखील अवयवाच्या प्रतिक्षेत असलेल्या रूग्णांची संख्या आणि अवयवदानाच्या प्रमाणात अजूनही मोठी दरी दिसून आहे. जागरूकता हे कोणा एकाचे काम नसून हे एक सांघिक कार्य आहे. जागरूकतेच्या माध्यमातून अवयवदानाचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे.अवयवदान हे एक महान कार्य आहे. आठवणीत राहण्यापेक्षा अवयवरूपी आठ जणांमध्ये राहावे.
“अवयवदान हे मानवतेच्या सर्वात उदात्त कार्यापैकी एक आहे. वैयक्तिक आयुष्यातील अत्यंत दुःखद प्रसंगीही एक कुटुंब पुढे येऊन अनेकांना आशा आणि नवजीवन देऊ शकते. नोबल हॉस्पिटल्समध्ये आमचे ध्येय केवळ यशस्वी अवयव प्रत्यारोपण करण्यापुरते मर्यादित नाही. अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण करणे, अधिकाधिक कुटुंबांना अवयवदानासाठी पुढे येण्यास प्रोत्साहित करणे आणि एक सक्षम व सर्वसमावेशक अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम उभारणे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अवयवदान चळवळ अधिक बळकट करण्यासाठी नोबल हॉस्पिटल्सने नेतृत्वाची भूमिका बजावावी आणि अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाधिक रुग्णांना जीवनाची दुसरी संधी मिळावी, हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे समूह कार्यकारी अधिकारी डॉ. संजय पठारे म्हणाले की,वैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रात अवयव प्रत्यारोपण ही एक अद्भूत बाब आहे. आज आपल्या देशात अवयवदानाचे प्रमाण प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे एक पेक्षाही कमी आहे. यामागचे कारण म्हणजे आजही समाजात अवयवदानाबाबत अनेक गैरसमज आहेत,म्हणूनच अवयवदानाबाबत जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. हा कार्यक्रम अवयवदात्यांच्या कुटुंबियांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी आणि अवयवदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. अवयवदानामुळे अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेल्या करणाऱ्या प्राप्तकर्त्या रुग्णाबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनाही नवी आशा आणि नवजीवन प्राप्त होते.
नोबल हॉस्पिटलमधील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी अवयवदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी सादर केलेल्या मूकनाटिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते महेश तुपे यांचा सत्कार करण्यात आला. नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरच्या वैद्यकीय संचालक डॉ.मनिषा पाठक यांनी आभार प्रदर्शन केले.


