Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे स्टेशन बसस्थानकातील सुविधांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी* *स्वच्छता...

पुणे स्टेशन बसस्थानकातील सुविधांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी* *स्वच्छता हा प्रवाशांचा मूलभूत अधिकार; हयगय खपवून घेणार नाही* — *परिवहन मंत्री प्रताप सरनाईक*

पुणे, दि. १४ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज पुणे स्टेशन बसस्थानकाला भेट देऊन विविध सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील हिरकणी कक्ष, पानपोई, प्रसाधनगृह तसेच प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या अन्य मूलभूत सुविधांची पाहणी केली. पाहणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटींबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि त्या तातडीने दूर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

बसस्थानकाची स्वच्छता, प्रसाधनगृहांची स्वच्छता व देखभाल, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच महिला प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना विशेष सूचना केल्या.

यावेळी मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील काही प्रवाशांशी थेट संवाद साधत एसटीच्या बससेवेबाबत त्यांचे अनुभव जाणून घेतले. प्रवाशांना येणाऱ्या अडचणी, बससेवेची गुणवत्ता आणि उपलब्ध सुविधांबाबत त्यांनी प्रवाशांकडून थेट अभिप्राय घेतला.

“एसटी ही सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रवाशांना चांगली बससेवा देण्याबरोबरच त्यांना स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. स्वच्छता हा प्रवाशांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही हयगय अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा निर्वाणीचा इशारा मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

प्रवाशांच्या सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत बसस्थानकांची नियमित पाहणी करून त्रुटींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments