‘
मुंबई : कोकणातील घनदाट जंगल, तेथील माणसांचे जगणे आणि वाघाशी जुळलेले अनोखे नाते यांचा भावनिक आणि वास्तवदर्शी वेध घेणारी ‘वाघबारस’ ही विशेष डॉक्युमेंटरी फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाघ आणि माणूस यांच्यातील संघर्षापलीकडे जाऊन त्यांच्यातील सहअस्तित्व, निसर्गाशी असलेले नाते आणि कोकणातील स्थानिकांच्या जीवनात वन्यजीवांचे असलेले स्थान या फिल्ममधून मांडण्यात आले आहे. त्यामुळे ‘वाघबारस’ ही केवळ वाघाची कथा नसून, माणूस, वाघ आणि निसर्ग यांच्या सहजीवनाचा भावस्पर्शी प्रवास आहे.
या डॉक्युमेंटरीच्या निर्मितीसाठी वन्यजीव अभ्यासक राणी प्रभुलकर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे प्रमुख तुषार चव्हाण तसेच पुण्याचे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
‘वाघबारस’चे दिग्दर्शन कौस्तुभ प्रियवंदा शेलार यांनी केले असून, कॅमेराची जबाबदारी स्वप्नील बेलोसे यांनी सांभाळली आहे. दर्शन महाजन आणि तन्मय वनगुले यांनी सहदिग्दर्शन केले आहे. संकलन शुभम आंबोले, तर हवाई ड्रोन चित्रण सुशांत अनवेकर यांनी केले आहे.
केळफा प्रोडक्शनच्या माध्यमातून निर्मित ‘वाघबारस’ महाराष्ट्रासह देशभरातील विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये पाठवण्यात येणार आहे. तसेच वनविभागाच्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमांमध्येही या डॉक्युमेंटरीचे विशेष सादरीकरण करण्यात येणार आहे.
फिल्म फेस्टिव्हल्स आणि वनविभागाच्या कार्यक्रमांनंतर ही डॉक्युमेंटरी YouTubeच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोकणातील निसर्ग, वन्यजीव आणि स्थानिक माणसांच्या जीवनाशी जोडलेले वाघाचे नाते एका वेगळ्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न या फिल्ममधून करण्यात आला आहे. “वाघ, माणूस आणि निसर्ग यांच्यातील नात्याकडे पाहण्याचा एक वेगळा अनुभव ‘वाघबारस’मधून प्रेक्षकांना मिळेल,” असा विश्वास दिग्दर्शक कौस्तुभ प्रियवंदा शेलार यांनी व्यक्त केला आहे.


