Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यशाळा संपन्न* *मतदार...

मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यशाळा संपन्न* *मतदार नोंदणी सुनावण्यांचे बारकाईने नियोजन करा – मिनल कळसकर*

*

▪️सुनावणीसाठी आवश्यक सुविधा, मनुष्यबळ व तांत्रिक बाबींची पूर्वतयारी करण्याच्या सूचना

पुणे, दि. २० : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार प्राप्त दावे व हरकतींवर दि. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत सुनावणी घेण्यात येणार आहे. या सुनावण्यांच्या अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबींचा विचार करून बारकाईने नियोजन करावे, अशा सूचना उप जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात ग्रामीण भागातील मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना सुनावणी प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, राजगड, मुळशी व मावळ तालुक्यांचे प्रांताधिकारी उपस्थित होते.

श्रीमती कळसकर म्हणाल्या, सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना मतदान केंद्रांचे विभाग वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी योग्य एका मतदान केंद्रावर सुनावणीची व्यवस्था करावी. एका सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे १० गावे असल्यास संबंधित गावांच्या मतदारांना सोयीचे होईल अशा जवळच्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक दिवस याप्रमाणे सुनावणीची तारीख, ठिकाण व वेळ निश्चित करावी. मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणी आयोजित करावयाची असल्यास ते ठिकाण मतदाराच्या पत्त्यापासून दोन किलोमीटरच्या अंतरात असेल, याची दक्षता घ्यावी.

सुनावणीसाठी आवश्यक साहित्य, इंटरनेट सुविधा, संगणक, प्रिंटर आदींची पूर्वतयारी करावी. सुनावणीच्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करावी, असेही त्यांनी सांगितले.
सुनावणीच्या वेळी सहा पथके कार्यरत ठेवावीत. यामध्ये गणना पत्रक काढून देणे, रोजनामा लिहिणे, मतदारांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणे, सन २००२ च्या मतदार यादीत नाव तपासणे तसेच नातेवाईकांच्या नावासोबत मॅपिंग करणे, सुनावणीतील निर्णयाच्या दोन प्रती तयार करणे, त्यापैकी एक प्रत मतदारास देणे व दुसरी प्रत गणना पत्रकासोबत संबंधित फाईलमध्ये ठेवणे, मतदारांनी सादर केलेली कागदपत्रे तसेच मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय ऑनलाइन अपलोड करणे आदी कामांचा समावेश करावा. तसेच मतदारांनी सादर केलेली कागदपत्रे, मूळ आदेश, रोजनामा, नोटीस आदी अभिलेखांचे योग्य पद्धतीने जतन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सुनावणीस उपस्थित राहताना मतदारांनी मूळ कागदपत्रे सोबत आणावीत. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सहा नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सादर केलेली कागदपत्रे शंकास्पद आढळल्यास संबंधित कागदपत्रे पडताळणीसाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद पुणे, पासपोर्ट कार्यालय, पुणे तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संबंधित नोडल अधिकाऱ्यांकडे पाठवावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

प्रशिक्षणास जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, राजगड, मुळशी व मावळ तालुक्यांचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तसेच तांत्रिक सहायक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments