*
*खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस; २३ जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप*
▪️*खेळाडूंच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव पाठीशी राहणार; बारामतीत ऑक्टोबरमध्ये कै. भाई नेरुरकर चषक स्पर्धा*
पुणे, दि. २१: बदलत्या युगात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने असोसिएशनच्या जिल्हा संघटकांसह तांत्रिक समितीला लॅपटॉपचे वितरण उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्ष सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. खेळ आणि खेळाडूंच्या सन्मानासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री श्रीमती पवार यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाला असोसिएशनच्या उपाध्यक्ष अश्विनी पाटील, सरचिटणीस डॉ. चंद्रकांत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार गोविंद शर्मा, शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार प्राप्त जनार्दन शेळके, अर्जून पुरस्कार प्राप्त सुरेखा कुलकर्णी, श्रीरंग इनामदार उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, बदलत्या युगामध्ये नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज बनली असून लॅपटॉप मुळे पेपरलेस कामकाजाला सुरुवात होईल. स्व. अजित दादांनी खो खो खेळाच्या चौफेर प्रगतीसाठी अत्यंत तळमळीने प्रयत्न केले. त्यांच्याच संकल्पनेतून पेपरलेस कामकाजासाठी लॅपटॉप वितरण होत असल्याचे सांगितले.
कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची व प्रतिष्ठित खो-खो स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली जाते. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ही स्पर्धा बारामती येथे होणार असून स्पर्धेच्या अनुषंगाने असोसिएशनने तयारीला सुरुवात करावी,असेही त्या म्हणाल्या.
यावेळी असोसिएशन अंतर्गत अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव,धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड,नंदुरबार, पालघर, परभणी, पुणे, रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे येथील सचिवांकडे लॅपटॉप सुपूर्द करण्यात आले.
००००


