पुणे, २४ ऑगस्ट: पुण्यातील डॉ. दीपमाला पाटील (पीएचडी इन फार्मसी) यांनी विकसित केलेले तंत्रज्ञानाधारित ‘फार्माईश’ हे व्यासपीठ ग्राहकांना त्यांच्या परिसरातील सहभागी परवानाधारक औषध विक्रेत्यांशी (फार्मसी स्टोर) जोडणार आहे. प्रिस्क्रिप्शनवर मिळणारी औषधे घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्याबरोबरच स्थानिक औषध विक्रेत्यांची आरोग्यसेवेतील भूमिका अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न देखील याद्वारे केला जाणर आहे, अशी घोषणा फार्माईशच्या प्रणेत्या डॉ. दीपमाला पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा भाग असलेले फार्माईश पुढील महिन्यापासून पुण्यातून सेवेला सुरुवात करणार आहे.
फार्मसी क्षेत्रातील व्यावसायिक आणि संशोधक म्हणून काम करताना आलेले अनुभव आणि निरीक्षणांमधून फार्माईशची संकल्पना पुढे आली. याबाबत डॉ. दीपमाला पाटील म्हणाल्या, “एखाद्या व्यक्तीची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला केवळ औषधांच्या दुकानात जाण्यासाठी त्या रुग्णाला एकटे का सोडावे लागावे, असा साधा प्रश्न माझ्या मनात आला. अनेकदा अडचण औषधांच्या दुकानांची उपलब्धता नसणे ही नसते, तर ग्राहक आणि सेवा देण्यास इच्छुक असलेल्या औषध विक्रेत्यांमध्ये असलेली दरी ही असते.”
औषध विक्रेतेही डिजिटल माध्यमांचा वाढत्या प्रमाणात स्वीकार करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या जवळच्या औषध विक्रेत्यांशी जोडणाऱ्या सामायिक तंत्रज्ञान व्यासपीठाची गरज असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. या माध्यमातून परिसरातील औषधांचे दुकान कायम ठेवून ग्राहकांसाठी औषध खरेदी अधिक सोयीची होणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना डॉ. पाटील म्हणाल्या की, फार्माईशच्या मोबाईल ॲपद्वारे ग्राहक सहभागी जवळच्या परवानाधारक औषध विक्रेत्यांना प्रिस्क्रिप्शन डिजिटल पद्धतीने पाठवू शकतील. डिजिटल अपलोड, प्रिस्क्रिप्शनचा फोटो काढणे, व्हॉट्सॲप तसेच व्हॉइस असिस्टन्स अशा विविध पर्यायांचा यात समावेश आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील ग्राहकांना त्याचा सहज वापर करता येणार आहे.
फार्माईशवर ग्राहकाने पाठविलेले प्रिस्क्रिप्शन संबंधित औषध विक्रेता स्वतंत्रपणे तपासेल आणि सदर मागणी पूर्ण करता येईल की नाही, याचा निर्णय घेईल. औषधे देणे, बिलिंग, पॅकिंग आणि घरपोच वितरणाची संपूर्ण जबाबदारी संबंधित परवानाधारक औषध विक्रेत्याचीच अर्थात फार्मसी स्टोरचीच असेल. फार्माईशचा वापर करण्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही स्वतंत्र शुल्क आकारले जाणार नाही.
फार्माईश हे ई-फार्मसी व्यासपीठ नाही. हे व्यासपीठ औषधांची खरेदी, साठवणूक, वितरण किंवा प्रत्यक्ष डिलिव्हरी करत नाही. तसेच औषध लिहून देणे किंवा वैद्यकीय निर्णय घेणे यामध्येही त्याची भूमिका नाही. औषध विक्रीतून कोणताही मार्जिन, टक्केवारी कमिशन किंवा नफ्यातील हिस्सा फार्माईशला मिळत नाही. त्याचे उत्पन्न मॉडेल हे किरकोळ औषध विक्रेत्यांकडून आकारण्यात येणाऱ्या एकदाच देय असणारे तंत्रज्ञान व्यासपीठ सहभागी शुल्क आणि प्लॅटफॉर्म वापर शुल्कावर आधारित आहे, अशी माहिती देखील डॉ. पाटील यावेळी यांनी दिली.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिसरातील औषध विक्रेत्यांना बळकटी देत ‘व्होकल फॉर लोकल’ या दृष्टिकोनाचे प्रतिबिंबही फार्माईशच्या माध्यमातून उमटते. औषधांचा जबाबदारीने वापर तसेच प्रतिजैविक प्रतिरोध (Antimicrobial Resistance – AMR) याबाबत जनजागृती ही फार्माईशच्या प्रमुख तत्त्वांपैकी आहेत.
सेवा सुरू करण्यापूर्वी फार्माईशच्या टीमने ५०० हून अधिक औषध विक्रेत्यांशी संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेतल्या असून संकल्पनेची व्यवहार्यता तपासली आहे. सुरुवातीला पुण्यात सेवा सुरू केल्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य शहरांमध्ये विस्तार करण्यात येणार आहे. भविष्यात देशभरातील ग्राहकांना त्यांच्या परिसरातील औषध विक्रेत्यांशी जोडण्याचे फार्माईशचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे.


