Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedचांगल्या गणेशोत्सव कार्यकर्त्यांचा सन्मान होतो याचा अभिमान कृषिमंत्री दत्तात्रय भरणे लोकमान्य...

चांगल्या गणेशोत्सव कार्यकर्त्यांचा सन्मान होतो याचा अभिमान कृषिमंत्री दत्तात्रय भरणे लोकमान्य जीवन गौरव पुरस्काराने उल्हास पवार सन्मानित : पुणे परिवारच्या वतीने विविध गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचा गौरव

पुणे : सध्या स्पर्धेचे युग आहे. प्रत्येकाला टेन्शन आहे. पुणे परिवारचे अभिनंदन कारण वाद्यपथकापासून सगळ्यांचा सन्मान केला, हे सोपे नाही. चांगल्या कार्यकर्त्यांचा सन्मान होतो, याचा अभिमान वाटतो. पूर्वी म्हणायचे, पुणे तिथे काय उणे; मात्र पुण्यात आता बदल झाला आहे. दुसऱ्यांना आनंद द्या, आनंदी रहा. आशीर्वाद देणारे लोक हीच आपली संपत्ती आहे. लोकांच्या कामी येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणाचे मन दुखावेल असे करू नका. आनंदात राहा, हसत रहा, असे मत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.

पुणे परिवारच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ नेते आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांना प्रदान करण्यात आला. टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार हेमंत रासने, महापौर मंजुषा नागपुरे, जन्मेजयराजे भोसले, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, सुनील रासने, अण्णा थोरात, विजयकुमार कुवळेकर, महेश सूर्यवंशी, पराग ठाकूर, सूर्यकांत पाठक, पुणे परिवाराचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी, उपाध्यक्ष शिरीष मोहिते, कार्याध्यक्ष विनायक घाटे, सह कार्याध्यक्ष प्रकाश ढमढेरे आदी उपस्थित होते.

दत्तात्रय भरणे म्हणाले, माणसाने न्यूनगंड बाळगू नका. मी एक शेतकऱ्याचा मुलगा असून मंत्री झालो, असे सांगत त्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या स्मृती जागवल्या. राजकारण निवडणुकीपुरते ठेवावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले, पुण्याने मला खूप काही दिले असून, पुण्याशी माझे नाते वेगळे आहे. शिवाजी मराठा शाळेच्या वसतिगृहातील गणपतीच्या मिरवणुकीच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, वसतिगृहाचा गणपती असताना गाडा करून नाचत-नाचत सारसबागेपासून जात कालव्यात गणपतीचे विसर्जन करत होतो. अशा प्रकारे त्यांनी पुण्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

विनायक घाटे म्हणाले, मागील २० वर्षांपासून हा सन्मान सोहळा होत आहे. गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या कार्यामुळे हा कार्यक्रम करण्याची प्रेरणा मिळाली. सामाजिक कार्यकर्ते समाजाला ऊर्जित अवस्था देतात. वर्षभर समाजात कार्य करणारे हे अष्टपैलू कार्यकर्ते आहेत.

पराग ठाकूर म्हणाले, आज काही दिवसांत गणेशोत्सव साजरा करण्याबाबत घुसळण होत आहे. हलाहल पचविण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे. गणपती कार्यकर्त्यांचा सन्मान हा आनंद देणारा आहे.
महेश सूर्यवंशी, विजय कुवळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. प्रताप परदेशी यांनी पुरस्कार्थ्यांची माहिती दिली.

*आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्काराने नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष परेश हराळे, देशप्रेमी मित्र मंडळ, एरंडवणेचे कार्यकर्ते मंदार बलकवडे, विद्यानगरी मित्र मंडळ, धनकवडीचे अध्यक्ष प्रतीक कुंभार, अखिल रामनगर मित्र मंडळ, येरवडाचे अध्यक्ष राकेश चव्हाण आणि श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट, तुळशीबागचे अध्यक्ष सागर दहिभाते यांचा गौरव करण्यात आला.*

*गणेश सेवा पुरस्कार मानस गोईलकर तसेच तृतीयपंथीय सर्व वादकांचे शिखंडी वाद्यपथक यांना प्रदान करण्यात आला. गणराया गुणगौरव विशेष सन्मान पराग प्रभाकर बंगाळे आणि येरवडा मध्यवर्ती कारागृहातील पुंडलिक वासुदेव खलोरकर यांना प्रदान करण्यात आला.*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments