पुणे,2 सप्टेंबर 2026 : मोठ्या शहरांमधील सेकंडरी व टर्शरी केअर रूग्णांलयांमध्ये तसेच निम शहरी व ग्रामीण भागात कॉर्निया संकलन सुविधांमध्ये (कॉर्निया रिट्रिव्हल) पिरॅमिड पध्दतीने रचना विकसित केल्यास दान करण्यात आलेल्या कॉर्नियाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी अधिक कार्यक्षम व्यवस्था निर्माण होऊ शकते,तसेच नेत्रदान वाढण्यास मदत होऊ शकते,असे मत तज्ञांनी व्यक्त केले.
पीबीएमएच्या एचव्ही देसाई आय हॉस्पिटलच्या नेत्रपेढीच्या वैद्यकीय संचालक व कॉर्निया विभागाच्या प्रमुख डॉ.शिल्पा जोशी यांनी सांगितले की,पिरॅमिड पध्दतीने रचना विकसित केल्यास उपलब्ध संसाधनांचे किफायतशीर पध्दतीने नियोजन करून कॉर्निया संकलनाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढू शकते.प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पूर्ण सुसज्ज नेत्रपेढी प्रस्थापित करणे शक्य नाही,म्हणूनच छोटी रूग्णालये व मोठी टर्शरी केअर रूग्णालये हे कॉर्निया रिट्रिव्हल सेंटर्स म्हणून कार्यरत राहू शकतात.ही केंद्रे नेत्रदानाबाबत जनजागृती वाढवणे,नेत्रदानाच्या वेळी आवश्यक औपचारिकता पूर्ण करणे,नेत्रदानानंतर कॉर्निया प्रिझर्व्हेशन माध्यमात सुरक्षित ठेवणे आणि जवळपासच्या नेत्रपेढीमध्ये पाठवणे अशी महत्त्वाची कामे करू शकतात.त्यानंतर नेत्रपेढ्यांमध्ये संकलित कॉर्नियाची प्रत्यारोपणासाठी उपयुक्तता तपासली जाऊ शकते.
प्रत्येक शहर किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी अशी कॉर्निया संकलन केंद्रे विकसित करणे योग्य ठरेल.पिरॅमिड रचनेच्या सर्वांत वरच्या स्तरावर अपेक्स किंवा व्यवस्थापन सांभाळणारी शिखर केंद्रे,त्याखाली सक्रीयपणे कार्यरत नेत्रपेढ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तळागाळाच्या स्तरावर नेत्र संकलन केंद्र असू शकतात.अशा विकेंद्रित व परस्पर जोडलेल्या व्यवस्थेमुळे देशातील नेत्रदान चळवळीला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होऊ शकते.
बहुंताश वेळेस घरी जाऊन केलेल्या नेत्र संकलनातून प्रामुख्याने नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झालेल्या वयोवृध्द व्यक्तींकडून कॉर्निया प्राप्त होतो,याउलट रूग्णालयांमध्ये कॉर्निया संकलनाची व्यवस्था केल्यास इतर वयोगटातील मृत व्यक्तींचे कॉर्निया प्राप्त होऊ शकतात.विशेषत: अपघातग्रस्त व इतर गंभीर कारणांमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींकडून कॉर्निया प्राप्त होऊ शकतो.


