पुणे, दि. ७ (जिमाका) : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेचे वितरण दोन हप्त्यांमध्ये करण्यात येते. यामध्ये ४० टक्के हिस्सा राज्य शासनामार्फत महाविद्यालयास, तर ६० टक्के हिस्सा केंद्र शासनामार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा करण्यात येतो.
शिष्यवृत्तीचा केंद्र शासनाचा ६० टक्के हिस्सा विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता स्वतःजवळ ठेवून, महाविद्यालयास देय असलेली उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा झाल्यापासून ७ दिवसांच्या आत संबंधित महाविद्यालयात जमा करणे अनिवार्य आहे.
तथापि, काही विद्यार्थी महाविद्यालयास देय असलेली रक्कम जमा करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करून शिष्यवृत्तीच्या रकमेपैकी महाविद्यालयास देय असलेली रक्कम विहित मुदतीत जमा करावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी केले आहे.
00000


