पुणे, दि.११: लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा प्रत्येक पात्र नागरिकाचा अत्यंत महत्त्वाचा घटनात्मक अधिकार आहे. अनुसूचित जाती तसेच तृतीयपंथी समाजातील पात्र नागरिकांनी विशेष सखोल व पुनरिक्षण प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
आपल्या मताच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या
मतदार यादीमध्ये नाव नसल्यास पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रांसह आपल्या मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधून मतदार नोंदणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. मतदार यादीतील नाव, पत्ता, वय, लिंग किंवा अन्य तपशीलात काही त्रुटी असल्यास आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी.
स्थलांतरित नागरिकांनी नवीन पत्त्यानुसार मतदार नोंदणी अथवा पत्ता बदलाची प्रक्रिया पूर्ण करावी. नव्याने मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी फॉर्म ६, मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी अथवा त्याबाबत हरकत नोंदविण्यासाठी फॉर्म ७, तर नाव, पत्ता व इतर तपशीलातील दुरुस्तीसाठी फॉर्म ८ भरता येईल. ऑनलाइन अर्जासाठी भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.in या संकेतस्थळाचा वापर करावा.
ऑफलाइन अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करता येणार आहेत. मतदार यादी दुरुस्तीच्या कामकाजाबाबत ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी सर्व पात्र मतदारांनी मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.
मतदार यादीत आपले नाव असणे म्हणजे आपल्या लोकशाही हक्काचे संरक्षण होय. त्यामुळे अनुसूचित जाती व तृतीयपंथी समाजातील प्रत्येक पात्र नागरिकाने एसआयआर प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन आपली मतदार नोंदणी तपासावी व आवश्यक ती कार्यवाही वेळेत पूर्ण करावी. तसेच कुटुंबातील, परिसरातील आणि समाजातील पात्र नागरिकांनाही याबाबत प्रोत्साहित करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
०००


