*समन्वयातून पायाभूत सुविधा सक्षम करण्याचे निर्देश; बससेवा, रस्ते रुंदीकरण, कचरा व्यवस्थापनाला प्राधान्य*
पुणे, दि. ११ : हिंजवडी आयटी पार्क व परिसरातील वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक, रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विविध शासकीय यंत्रणा व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. हिंजवडी परिसरातील पायाभूत सुविधांचा एकात्मिक पद्धतीने विकास करून नागरिक तसेच आयटी क्षेत्रातील मनुष्यबळाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
हिंजवडी परिसरातील समस्या सोडविण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार शंकर मांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम तसेच हिंजवडी, मान व वारुंजी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आयटी कंपन्यांमध्ये ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कंपनीनिहाय प्रवासाचा डेटा संकलित करण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे पीएमपीएमएल बससेवेचे मार्ग, प्रारंभ व अंतिम थांबे निश्चित करून आवश्यक त्या ठिकाणी बससेवा वाढविण्यात येणार आहे. सुमारे २० ते ३० अतिरिक्त बसेसचे तातडीने नियोजन करण्यात येत असून, भविष्यात उपलब्ध होणाऱ्या नवीन ५०० बसेसमध्ये हिंजवडी व चाकण परिसराला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच मेट्रो स्थानकांपासून कार्यालये व नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचण्यासाठी फिडर बससेवा सुरू करण्याचेही नियोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
हिंजवडी परिसरातील रस्ते रुंदीकरणासाठी सहा प्रमुख रस्ते प्राधान्याने निश्चित करण्यात आले आहेत. या रस्त्यांसाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून १ डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रस्ते रुंदीकरणात अडथळा ठरणारे वीजेचे खांब व भूमिगत केबल्स हलविण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने अंदाजपत्रक तयार करून कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सर्व्हिस रोडच्या डांबरीकरणाचे काम पुढील १० ते १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
वीजपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी हिंजवडी परिसरात नवीन वीज उपकेंद्रे उभारण्याच्या कामाला गती देण्यात येणार आहे. लवळे व महाळुंगे येथील प्रस्तावित उपकेंद्रांसाठी मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याबरोबरच आवश्यक जागा ॲडव्हान्स पझेशनने उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या.
हिंजवडी परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रस्तावित पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. योजनेच्या कामासाठी आवश्यक जागा तातडीने उपलब्ध करून देऊन कामात कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्यास संबंधित यंत्रणांना सांगण्यात आले.
घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींशी समन्वय साधून महिनाभरात ठोस कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. सोसायट्यांमध्ये कचरा संकलन व व्यवस्थापनाची प्रभावी यंत्रणा उभारण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
हिंजवडीतील बसथांबे, बसशेल्टर तसेच मेट्रो परिसराचे सुशोभीकरण करण्याचाही निर्णय घेण्यात आला. स्थानिक नागरिक व संबंधित भागधारकांशी चर्चा करून बसथांब्यांची ठिकाणे निश्चित करण्यात येणार आहेत.
बैठकीत हिंजवडी, मान व वारुंजी परिसरातील नागरिकांनी वाहतूक, पाणी, वीज, रस्ते तसेच कचरा व्यवस्थापनासंदर्भातील विविध अडचणी मांडल्या. जिल्हाधिकारी डुडी यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी त्यावर तत्काळ चर्चा केली. नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. नागरिकांच्या सहभागातून आणि विविध विभागांच्या समन्वयातून या समस्या सोडविण्यावर भर देण्यात आला.
“हिंजवडी परिसरातील कोणतीही उपाययोजना शास्त्रीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने झाली पाहिजे. वाहतूक, पाणी आणि वीज या तिन्ही मूलभूत सुविधांचा समन्वय साधून नागरिक व आयटी क्षेत्रातील मनुष्यबळाला आवश्यक सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येतील,” असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
बैठकीत विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन प्रत्येक कामासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येणार असून, पुढील आढावा बैठक गुरुवारी दुपारी ४ वाजता घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.


