पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग आणि इंगळे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कै. डॉ. टी. आर. इंगळे यांच्या स्मरणार्थ आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय संशोधनपर व्याख्यान व पोस्टर सादरीकरण स्पर्धेला लेडी रमाबाई हॉल येथे प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रासह आठ राज्यांतील विविध विद्यापीठातून विद्यार्थ्यांचा सहभाग लाभलेल्या या उपक्रमात ३९ विद्यार्थ्यांनी व्याख्यानासाठी, तर ६४ विद्यार्थ्यांनी पोस्टर सादरीकरणासाठी सहभाग नोंदविला. “केमिस्ट्री:शेपिंग बेटर टुमारो” हे यंदाच्या उपक्रमाची मुख्य संकल्पना आहे.
महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तुषार कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. सुनीता जाधव व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना आरबाळे-तोरणे यांच्यासह कै. डॉ. टी. आर. इंगळे यांचे आप्तेष्ट, स्नेही व नातेवाईक उपस्थित होते. त्यांचे कनिष्ठ सुपुत्र मुकुंद इंगळे आणि त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांची विशेष उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील म्हणाले, कै. डॉ. टी. आर. इंगळे हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि याच महाविद्यालयातील प्राध्यापक होते. सुमारे तीन दशकांपूर्वी सुरू झालेला हा संशोधनपर उपक्रम आजही सातत्याने सुरू आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. महाराष्ट्रातील आठ राज्यांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याने ही स्पर्धा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय झाली आहे. विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या पाठबळाची आज पूर्वीपेक्षा अधिक गरज आहे. शिक्षणातून विद्यार्थ्यांना मनापासून आधार आणि अशा संधी देता आल्या, तर त्यांच्या विकासाला चालना मिळेल. विद्यार्थ्यांना विकसित होण्यासाठी अशा संधी निर्माण करणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे.
इंगळे परिवाराकडून दोन संशोधन पुरस्कार
कै. डॉ. टी. आर. इंगळे यांचे कनिष्ठ सुपुत्र मुकुंद इंगळे यांनी संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन पुरस्कारांची घोषणा केली. रसायनशास्त्र क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञ किंवा प्राध्यापकाचा दरवर्षी गौरव करण्यासाठी कै. डॉ. टी. आर. इंगळे मेमोरियल केमिस्ट्री रिसर्च एक्सलन्स अवॉर्ड, तर स. प. महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रातील पीएच.डी. विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट संशोधन करणाऱ्या एका संशोधकाला कै. डॉ. टी. आर. इंगळे मेमोरियल रिसर्च स्कॉलर अवॉर्ड २०२७ पासून देण्यात येणार आहे. यापैकी प्रथम पुरस्काराची रक्कम पंचवीस हजार रुपये असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मुकुंद इंगळे म्हणाले, कै. डॉ. टी. आर. इंगळे यांना शिकवण्यापेक्षा शिकण्यात अधिक आनंद मिळत होता. त्याच भावनेतून या प्रयोगशाळेची निर्मिती झाली. त्यांचे स्मरण केवळ नाव देण्यापुरते मर्यादित न राहता, तरुणांना शिकण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी आणि नवे शोध घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यातून व्हावे. चांगल्या वैज्ञानिकाला आपल्या संशोधनाचे महत्त्व स्पष्ट करता आले पाहिजे. या ३० वर्षांच्या प्रवासाच्या स्मरणार्थ यावर्षीपासून संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी पंचवीस हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार सुरू करण्यात येत आहे.
तुषार कुलकर्णी म्हणाले, अनेकांचे या उपक्रमात योगदान आहे. इंगळे सर पूर्वी आपल्याकडे होते; मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी साता समुद्रापार राहूनसुद्धा महाविद्यालयाशी असलेली नाळ कायम जपली आहे. असे उदाहरण खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते. एस. पी. कॉलेज आणि शिक्षण प्रसारक मंडळी हे समाजासाठी काहीही करण्याचे सर्वोत्तम व्यासपीठ आहे. शिक्षण क्षेत्रासाठी तुम्ही जे काही योगदान द्याल, त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल, याची मी ग्वाही देतो.
रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वंदना आरबाळे-तोरणे यांनी विभागातील विविध शैक्षणिक व संशोधनपर उपक्रमांची माहिती दिली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रयोगशीलता आणि संशोधन सादरीकरणाचे कौशल्य विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कै. डॉ. टी. आर. इंगळे यांच्या जीवनकार्याचा, संशोधनातील योगदानाचा आणि स. प. महाविद्यालयाशी असलेल्या त्यांच्या ऋणानुबंधांचा परिचय करून देणारा जीवनपटाचा व्हिडिओ यावेळी दाखविण्यात आला. कै. डॉ. इंगळे हे स. प. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच प्राध्यापक होते. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनपर योगदान दिले असून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), पुणे आणि अमेरिका येथे प्राध्यापक व शास्त्रज्ञ म्हणून कार्य केले.
या उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सुनीता जाधव, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना आरबाळे-तोरणे तसेच समन्वयक डॉ. दिनेश गरुड व डॉ. प्रणव चंद्रचूड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. एमआयटी चे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, रसायनशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी विजय कडू व अनिल अमिररेड्डी यांची ही विशेष उपस्थिती होती. प्रा. मानसी राठोड यांनी सूत्रसंचालन केले.


