पुणे : सामाजिक बांधिलकी आणि शिक्षण प्रसाराचा वसा जपणाऱ्या नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्ट तर्फे यंदा गणेशोत्सवात ‘विद्या गणेश’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये गणेशभक्तांच्या सहभागातून एक रेघी १ हजार नवीन वह्यांचा गणरायाला नैवेद्य दाखविण्यात आला.
‘गणपती सर्वांचा आहे’ आणि ‘विद्या हाच खरा प्रसाद’ या भावनेतून संकलित केलेल्या या १ हजार नवीन कोऱ्या वह्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध सामाजिक संस्था महारोगी सेवा समिती, वरोरा – आनंदवन (बाबा आमटे) येथील शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. सामाजिक सहभागातून श्री माती गणपती बाप्पाला या नवीन वह्यांचा अनोखा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
शिक्षणापासून कोणतेही मूल वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. पुणेकरांच्या उदंड प्रतिसादामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. पुणेकरांच्या सक्रिय सहभागामुळे हा गणेशाचा विद्या रुपी प्रसाद गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे, अशी भावना मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त केली.


