*भोर येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद’ उपक्रमात युवकांना मार्गदर्शन*
पुणे दि. २१ : युवकांनी रोजगाराच्या उपलब्ध संधींचा लाभ घेण्यासाठी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासोबतच कौशल्यविकास, प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगारासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. रोजगारासाठी संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व, मुलाखतीला सामोरे जाण्याची पद्धत आणि स्वतःचे प्रभावी सादरीकरण यांनाही महत्त्व आहे. यासाठी रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील तालुकास्तरावरील प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) युवकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, असे रोजगार व उद्योजकता अधिकारी राजेश धर्माधिकारी यांनी सांगितले.
जय हनुमान गणेश मंडळ, भेलेकरवाडी, ता. भोर येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित लोकसंवाद उपक्रमात युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जय हनुमान गणेश मंडळ, भेलेकरवाडीचे अध्यक्ष विशाल कंक, माजी अध्यक्ष धीरज दानवले, मंडळ अधिकारी सी. पी. जगताप, ग्राम महसूल अधिकारी विवेक भालेराव उपस्थित होते.
*रोजगार मेळाव्याचा युवकांनी लाभ घ्यावा*
येत्या २९ सप्टेंबर रोजी कौशल्य विकास विभागातर्फे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. युवकांनी आपल्या पात्रतेनुसार सहभागी होऊन रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा. तसेच, बेरोजगारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन रोजगार व उद्योजकता अधिकारी राजेश धर्माधिकारी यांनी केले.
रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध असून, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस क्षेत्रात संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पदवीधर, आयटीआय तसेच विविध कौशल्याधारित पात्रता असलेल्या युवकांनी आपल्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
*मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा*
रोजगार मेळाव्यापूर्वी संबंधित आयटीआयमध्ये युवकांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुलाखतीला सामोरे जाण्याची पद्धत, संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, वेशभूषा आणि स्वतःचे प्रभावी सादरीकरण याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. युवकांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून नोंदणी करून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
*कौशल्यविकासासोबत शासकीय योजनांची माहिती*
युवकांनी कौशल्य प्रशिक्षण, रोजगार मार्गदर्शन, अप्रेंटिसशिप तसेच स्वयंरोजगारासाठी उपलब्ध शासकीय योजनांची माहिती घेऊन पात्रतेनुसार अर्ज करावा. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांनी संबंधित विभागाकडून कर्ज, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उपलब्ध शासकीय सुविधांची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
रोजगार मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि कौशल्यवृद्धीमुळे भविष्यात अधिक चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे युवकांनी रोजगार मेळावा, कौशल्य प्रशिक्षण आणि शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपली रोजगारक्षमता वाढवावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.
रोजगार, प्रशिक्षण किंवा शासकीय योजनांबाबत शंका असल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून माहिती घ्यावी आणि उपलब्ध योजनांमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित लोकसंवाद उपक्रमाबाबत माहिती अधिकारी गणेश फुंदे यांनी माहिती दिली. मंडळ अधिकारी सी. पी. जगताप यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी, युवक, युवती, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयोजन जितेंद्र खंडागळे, रावजी बांबळे यांनी केले.
*कापूरहोळ येथे लोकसंवाद*
कापूरहोळ, ता. भोर येथे
जिल्हा माहिती कार्यालयाच्या लोकसंवाद उपक्रमांतर्गत वीर धाराव माता मित्र मंडळ, कापूरहोळ येथे रोजगार व उद्योजकता अधिकारी श्री. राजेश धर्माधिकारी यांनी युवकांना कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना, प्रशिक्षण व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच, येत्या २९ सप्टेंबर रोजी आयोजित रोजगार मेळाव्यात युवकांनी सहभागी होऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पंकज भाबीगाडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


