पुणे, दि. २१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभारी समाजसेवक गितांजली शिवचरण आणि समूह संघटिका अपर्णा प्रशांत मोरे यांनी संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, नारायण पेठ तसेच हनुमान मित्र मंडळ प्रतिष्ठान, नारायण पेठ येथे नागरिकांशी संवाद साधून योजनांची माहिती दिली.
महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य, उच्च शिक्षणासाठी मदत, महिला सक्षमीकरण, दिव्यांगांसाठी अर्थसहाय्य, कौशल्य विकास व विविध व्यावसायिक अभ्यासक्रम, चारचाकी वाहन प्रशिक्षण तसेच बचत गटांच्या माध्यमातून महिलांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
महिलांनी बचत गट स्थापन करून त्यामध्ये सहभागी व्हावे. बचत गटांच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती, प्रशिक्षण तसेच व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांगत्व प्रमाणपत्र व यूडीआयडी कार्डासाठी समाज विकास विभागाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले.
नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवती, महिला व नागरिकांसाठी दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत स्वारगेट येथील गणेश कला-क्रीडा मंच येथे रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी या मेळाव्यात सहभागी होऊन रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी संयुक्त प्रसाद मित्र मंडळाचे अध्यक्ष अजित परांजपे, कार्याध्यक्ष कुणाल आहेर, उपाध्यक्ष निखिल हजारे तसेच हनुमान मित्र मंडळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल सुतार, खजिनदार किरण शिंदे तसेच आतिक सय्यद यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


