*‘विकसित भारत संकल्प अभियाना’अंतर्गत ‘नशामुक्त युवा’ उपक्रम; पोलीस आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग*
पुणे : तरुणाईला व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देण्यासाठी एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने ‘विकसित भारत संकल्प अभियाना’अंतर्गत ‘नशामुक्त युवा’ उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली तसेच निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी पोलीस आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला पुणे शहरातील हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी-काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार पवार, विश्वराज हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध गरुड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., कुलसचिव डॉ. महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव निलवर्ण आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) संचालक प्रा. विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या अभियानांतर्गत युवकांना व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगणे, व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करणे आणि समाजात व्यसनमुक्तीचा सकारात्मक संदेश पोहोचविणे यावर भर देण्यात आला. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि निरोगी व सक्षम भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमातून युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, आरोग्यविषयक जागरूकता वाढविणे आणि व्यसनमुक्त भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्याचा संदेश देण्यात आला.
*चौकट*
*मोहापायी अशा चुका करू नयेत- उदमले*
याप्रसंगी ‘लेडी सिंघम’ म्हणून परिचित असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले म्हणाल्या की, महाविद्यालयीन काळ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून आपल्या पालकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. क्षणिक आनंदाच्या मोहापायी अशा चुका करू नयेत, ज्यामुळे त्यांच्या भविष्यावर आणि करिअरवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे आवाहनही त्यांनी केले.


