Thursday, October 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedसस्टेनेबिलिटी अँड एनर्जी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एसईपीए) तर्फे पुण्यात प्रगत स्वच्छ ऊर्जा...

सस्टेनेबिलिटी अँड एनर्जी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एसईपीए) तर्फे पुण्यात प्रगत स्वच्छ ऊर्जा विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन

पुणे, १५ ऑक्टोबर २०२६ : सस्टेनेबिलिटी अँड एनर्जी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एसईपीए) तर्फे सहाव्या ‘सस्टेनेबल भारत – ॲडव्हान्स्ड क्लीन एनर्जी वर्कशॉप २०२६’ या कार्यशाळेच्या पुणे आवृत्तीचे उद्घाटन आज सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात करण्यात आले. १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय कार्यशाळेत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राध्यापक, संशोधक आणि ऊर्जा क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झाले आहेत. भारतातील स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक प्रगती आणि उपाययोजनांवर या कार्यशाळेत चर्चा करण्यात येत आहे.

 

या कार्यशाळेत प्रामुख्याने बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम्स (बीईएसएस) अर्थात बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या वीज प्रकल्पांसाठी तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील वापरासाठी असलेल्या प्रणालींचा समावेश आहे. तांत्रिक सत्रे आणि तज्ज्ञांच्या पॅनेल चर्चांमध्ये बॅटरी साठवण तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जेचे एकात्मीकरण, वीज ग्रीडची लवचिकता, प्रकल्पांची व्यवहार्यता, सुरक्षितता, धोरणे आणि या क्षेत्रातील नव्या व्यावसायिक संधी अशा विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे.

 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्किल कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित शर्मा उपस्थित होते. यावेळी सस्टेनेबिलिटी अँड एनर्जी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे (एसईपीए) अध्यक्ष डॉ.रघुराम अर्जुनन, सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. सुनील भिरुड, सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या इलेक्टिकल विभागाचे विभागप्रमुख डॉ. राजाराम उगले, सस्टेनेबिलिटी अँड एनर्जी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे कार्यकारी परिषद सदस्य आदित्य रामलिंगम आणि एसईपीए चे सचिव निखिल मंगलोरी उपस्थित होते.

 

यावेळी एसईपीएचे अध्यक्ष डॉ.रघुराम अर्जुनन म्हणाले, “अक्षय ऊर्जेचे प्रभावी एकात्मीकरण आणि विश्वासार्ह वीज व्यवस्था उभारण्यासाठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली महत्त्वपूर्ण आहेत. ‘सस्टेनेबल भारत २०२६’ ही कार्यशाळा उदयोन्मुख तंत्रज्ञान, व्यावसायिक संधी आणि संशोधनाच्या प्राधान्यक्रमांवर उद्योग क्षेत्रात संवाद घडवून आणण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. एसईपीए विद्यार्थी परिषदेमुळे नवोपक्रम, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य तसेच भविष्यातील स्वच्छ ऊर्जा क्षेत्रासाठी कुशल व्यावसायिक घडविण्याच्या प्रयत्नांना अधिक चालना मिळेल.”

 

एसईपीए ने यावेळी पुण्यात विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेचीही घोषणा केली. संशोधन, प्रशिक्षण आणि उद्योग क्षेत्राशी संवाद यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची तांत्रिक कौशल्ये विकसित करून स्वच्छ ऊर्जा क्षेत्रासाठी आवश्यक असलेली प्रतिभा आणि कुशल मनुष्यबळ घडविण्यावर भर दिला जाणार आहे.

 

एसईपीए आपल्या कन्सोर्टियमच्या माध्यमातून उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सहकार्यपूर्ण संशोधन तसेच तंत्रज्ञान विकासालाही प्रोत्साहन देते. या उपक्रमांना राष्ट्रीय संस्थांकडून मिळणाऱ्या संशोधन निधीचे पाठबळ लाभते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments