*पौष्टिक तृणधान्य उप अभियानांतर्गत शेतकरी गटांना पीक प्रात्यक्षिकांसाठी १०० टक्के अनुदान*
पुणे, दि. १७ (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण उप अभियान-पौष्टिक तृणधान्य (NFSNM-NC) अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षात रब्बी हंगामासाठी प्रमाणित ज्वारी बियाण्यांचे ५० टक्के अनुदानावर वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार असून, पात्र शेतकरी व शेतकरी गटांनी संबंधित घटकांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे.
या अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये दहा वर्षांच्या आतील वाणांसाठी प्रतिकिलो ३० रुपये, तर दहा वर्षांवरील वाणांसाठी प्रतिकिलो १५ रुपये अनुदान अनुज्ञेय आहे. तसेच, पीक प्रात्यक्षिके या घटकांतर्गत शेतकरी गटांना बियाणे घटकासाठी १०० टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या दोन्ही घटकांचे उद्दिष्टांक महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या अभियानाच्या माध्यमातून प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिकांसोबतच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, शेतकरी प्रशिक्षण तसेच जिल्हास्तरीय कृषी महोत्सव असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांमुळे पौष्टिक तृणधान्य पिकांचे उत्पादन वाढविणे, सुधारित तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि शेतकऱ्यांना आधुनिक कृषी पद्धतींची माहिती उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
*ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन*
पात्र शेतकरी व शेतकरी गटांनी प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिके या घटकांसाठी “महाडीबीटी पोर्टल” (https://mahadbt.maharashtra.gov.in) येथे जाऊन Farmer Login द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत. अभियानातील इतर उपक्रमांची माहिती व लाभ मिळविण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
०००


