पायवाटेच्या परिसरात नैसर्गिक हिरवळ निर्माण करणे आणि पर्यावरणाचे दीर्घकालीन संवर्धन हे या चार दिवसांच्या उपक्रमाचे उद्दिष्ट
जेजुरी, १७ ऑक्टोबर २०२६ : कास्टिंग्ज आणि पिग आयर्न उत्पादन क्षेत्रातील भारतातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड’ने (केएफआयएल) जेजुरीतील श्री कडेपठार या पवित्र स्थळी वृक्षारोपणाचा चार दिवसांचा उपक्रम राबवला. श्री कडेपठार हे भगवान खंडोबाचे मूळ स्थान मानले जाते. केएफआयएल ही कंपनी पोलाद आणि सीमलेस ट्यूब्स क्षेत्रातही कार्यरत आहे.
कंपनीच्या या उपक्रमामध्ये भोकर, आवळा आणि चिंच यांसह ११ प्रकारच्या स्थानिक झाडांची ३,००० हून अधिक रोपे लावण्यात आली. १४ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली. यातून पर्यावरणाचे रक्षण, जैवविविधतेचे जतन आणि शाश्वत विकास यांसाठीची कंपनीची बांधिलकी अधोरेखित झाली.
श्री खंडोबा देवता आणि लिंग कडेपठार ट्रस्ट यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. कडेपठार ते जेजुरी खंडोबा मंदिर यांना जोडणाऱ्या सुमारे तीन किलोमीटरच्या पायवाटेच्या दुतर्फा, तसेच कडेपठारकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या परिसरात दाट हिरवळ निर्माण करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा एक भाग आहे. या ठिकाणी झाडांची लागवड केल्यामुळे नैसर्गिक सावली मिळेल आणि स्थानिक जैवविविधतेत वाढ होईल. तसेच, भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांना अधिक आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेता येईल.
या कार्यक्रमात ‘केएफआयएल’चे कर्मचारी, वन विभागाचे प्रतिनिधी, तसेच नाझरे येथील श्री नागेश्वर विद्यालयातील सुमारे ६० विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी उत्साहाने भाग घेतला. स्वेच्छेने वृक्षारोपण करून त्यांनी झाडांच्या संवर्धनासाठी योगदान दिले. लावलेल्या रोपांची योग्य निगा राखता यावी आणि त्यांची वाढ चांगली व्हावी, यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचाही या कार्यक्रमात प्रारंभ करण्यात आला.
या उपक्रमाविषयी बोलताना ‘किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड’चे कार्यकारी संचालक निशिकांत एकतारे म्हणाले, “केवळ वृक्षारोपण म्हणजे पर्यावरण संवर्धन, असे ‘किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज’मध्ये आम्ही मानत नाही. पुढील अनेक पिढ्यांनाही लाभ मिळेल अशा परिसंस्था निर्माण करणे आणि त्यांचे जतन करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे आम्हाला वाटते. आमच्या आताच्या या उपक्रमात स्थानिक प्रजातींच्या झाडांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे येथील जैवविविधतेचे संवर्धन होईल. तसेच, या भागातील वनस्पती आणि प्राण्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल. पर्यावरणीय समतोल राखण्यासही मदत होईल. कडेपठार येथे भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांच्यासाठी अधिक हिरवेगार व आल्हाददायक वातावरण निर्माण करण्याकरीता स्थानिक संस्था आणि नागरिकांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे.”
‘केएफआयएल’च्या जेजुरी येथील कारखान्याच्या परिसरात आणि आसपासच्या भागात पर्यावरणाचे संवर्धन करून, स्थानिक लोकांचे कल्याण साधत शाश्वत विकासाला चालना देण्यास कंपनी कटिबद्ध आहे. या तिच्या बांधिलकीचे प्रतीक म्हणजे हा उपक्रम आहे.
या उपक्रमाला महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या प्रतिनिधी दीपाली शिंदे आणि धनंजय देवकर यांचेही सहकार्य मिळाले. मंदिर ट्रस्टचे विश्वस्त मयूर दिदभाई, ऋषिकेश सातभाई आणि सदानंद सुरेश बारभाई हेही यावेळी उपस्थित होते. ‘केएफआयएल’च्या वतीने या उपक्रमात सहभागी झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मुख्य परिचालन अधिकारी पी. एम. मनोजकुमार, जेजुरी कारखान्याचे प्रमुख पी. सत्यमूर्ती आणि मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख झाकी
र शेख यांचा समावेश होता.


