पुणे, दि. १८ : भारत निवडणूक आयोगाने पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयान्वये या निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी म्हणजे शुक्रवार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या १६ ऑक्टोबर २०२६ च्या सुधारित परिपत्रकानुसार खासगी आस्थापनात काम करणाऱ्या मतदारांना मतदानासाठी २ ऐवजी ४ तासांची विशेष सवलत द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
निवडणुकीतील मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५ब नुसार भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही रजा त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे. ही रजा केवळ त्या मतदार संघाचे मतदार असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असल्याने सर्व शासकीय कार्यालयांचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू राहील याची काळजी कार्यालय प्रमुखांनी घ्यावी.
ही विशेष नैमित्तिक रजा खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना लागू होणार नाही. खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर, शिक्षक मतदारांना मतदानासाठी यापूर्वी कळविलेल्या दोन तासांऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्यात यावी, असे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली -उगले यांनी कळविले आहे.
००००


