पुणे, दि.१९: विशेष सखोल पुनरक्षण कार्यक्रमांतर्गत ॲनोमली आणि नो-मॅपिंगच्या कामाला गती देण्यात आली असून हे काम २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. जास्तीत जास्त पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट होण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी केले.
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आहे. प्राप्त झालेल्या दावे व हरकती १० नोव्हेंबर पर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. व १६ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ८६ हजार ६४३ फॉर्म नंबर ६, १ हजार ३१५ फॉर्म नंबर ७ आणि ३२ हजार २४३ फॉर्म नंबर ८ प्राप्त झाले असून या सर्व अर्जांवर १० नोव्हेंबर पर्यंत निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्रीमती कळसकर यांनी सांगितले.
तसेच २३ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे विभाग शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कमी मतदार संख्या असणारे मतदान केंद्र नजीकच्या १६ किलोमीटरच्या आत असणाऱ्या दुसऱ्या मतदान केंद्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. बदल करण्यात आलेल्या मतदान केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या pune.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली असून राजकीय पक्षांनी याबाबत जास्तीत जास्त मतदारांना अवगत करावे, असेही आवाहनही श्रीमती कळसकर यांनी केले.
००००


