पुणे : निसर्ग आपल्याला काहीही न मागता भरभरून देत असतो. मात्र, आजच्या जीवनशैलीत आपण निसर्गापासून दूर जात आहोत. मातीशी आपली नाळ जोडलेली असली पाहिजे. हॉटेलमधील कामकाजही निसर्गाशी सुसंगत असणे आवश्यक आहे. निसर्गाचे महत्त्व ओळखून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारली पाहिजे. निसर्गाकडे जाण्याऐवजी स्वतः निसर्ग होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत माजी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी व्यक्त केले.
विश्वाह् क्रिएशन्स पब्लिकेशन्सतर्फे प्राचार्य डॉ. अजयकुमार राय लिखित ‘शाश्वत हॉटेल व्यवस्थापन : तत्त्वे, कार्यपद्धती आणि भविष्यातील दृष्टिकोन’ या पुस्तकाचे प्रकाशन गांधी भवन येथे करण्यात आले. या वेळी हॉटेल रॅडिसन ब्लू, खराडीचे महाव्यवस्थापक पंकज सक्सेना, प्राचार्य डॉ. अजयकुमार राय, अंजली अत्रे राय उपस्थित होते.
पंकज सक्सेना म्हणाले, हे पुस्तक अगदी योग्य वेळी प्रकाशित झाले आहे. सध्या संपूर्ण जग शाश्वततेच्या दिशेने वाटचाल करत आहे. जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत असून, भविष्यातील तापमानवाढीचे अंदाज अधिक गंभीर आहेत. त्यामुळे शाश्वतता हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय आहे. आता केवळ पाण्याचे संवर्धन करण्याचा विषय राहिलेला नाही, तर पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची वेळ आली आहे. मोठ्या शहरांमध्ये पाणी सहज उपलब्ध होणारे संसाधन राहिलेले नाही. त्यामुळे शाश्वतता हाच भविष्याचा मार्ग आहे. शाश्वतता म्हणजे केवळ प्लास्टिक निसर्गात फेकू नये, एवढाच मर्यादित विचार नाही, तर ही संकल्पना त्यापेक्षा खूप व्यापक आहे. शाश्वतता ही एका वेगळ्या स्तरावरील जीवनशैली आणि संस्कृती आहे.
या वेळी प्राचार्य डॉ. अजयकुमार राय यांनी पीपीटी सादरीकरणाद्वारे हॉटेल उद्योगातील पर्यावरणपूरक कामकाजाची तत्त्वे, कार्यपद्धती आणि भविष्यातील दिशा यांची माहिती दिली. निवेदक आणि बालसाहित्यिक अंजली अत्रे राय यांनी सूत्रसंचालन केले.


