Friday, October 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedसाहित्य संमेलने औपचारिक न राहता चळवळ व्हावी : डॉ. सदानंद मोरे ...

साहित्य संमेलने औपचारिक न राहता चळवळ व्हावी : डॉ. सदानंद मोरे आळंदी येथे १७ व्या नांदी साहित्य संमेलनाचा समारोप संपन्न

 

 

आळंदी, दिनांक ३० ऑक्टोबर : “साहित्य संमेलना’ची प्रदीर्घ परंपरा ही मराठी भाषेचे वैभव आहे. साहित्य संमेलनं ही औपचारिक न राहता ती अखंड चळवळ व्हावी, यासाठी १०० व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भरवलेली ‘संमेलनांची नांदीयाळी’ महाराष्ट्रात साहित्याचे नवे वातावरण निर्माण करेल.” असे प्रतिपादन साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ व्या नांदी संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी डॉ. उल्हासदादा पवार हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, खेडचे आमदार बाबाजी काळे आणि नॅशनल बुक ट्रस्ट चे संचालक राजेश पांडे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. मसापचे कार्यवाह सुनील महाजन, राजन लाखे, प्रभाकर ओव्हाळ, बापूसाहेब मोरे, उषाताई विश्वनाथ कराड आणि माईर्स एमआयटीच्या महासचिव प्रा. स्वाती कराड – चाटे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

 

डॉ. सदानंद मोरे म्हणाले,”मराठी ही जगातील अशी एकमेव भाषा आहे, जिचे आद्यग्रंथकार अमृताशीही पैज जिंकण्याचे आव्हान देतात. आपण अमृतालाही लाजवणाऱ्या समृद्ध भाषेचे वारसदार आहोत आणि हे वैभव जपणे आपले कर्तव्य आहे.”

 

डॉ. उल्हास पवार म्हणाले,”आज संत विचारांचीच दिशा संपूर्ण जगाला तारू शकते. संत ज्ञानेश्वरांचे ‘पसायदान’ संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयापर्यंत पोहोचून खऱ्या अर्थाने ‘विश्वप्रार्थना’ बनले आहे; हीच संतपरंपरेची आणि मराठी संस्कृतीची जागतिक उंची आहे.”

 

राजेश पांडे म्हणाले,”नांदी संमेलने ही आढावा घेण्यासाठी नसून, पुढील १०० वर्षे मराठी भाषा डिजिटल युगात कशी टिकेल, सक्षमपणे वाढेल आणि युगानुकूल ठरेल, याचा भक्कम पाया रचण्यासाठी आहे.”

 

आमदार बाबाजी काळे म्हणाले,”मराठी भाषेबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे. संत वांग्मयातील मानवतावादी विचार मराठी भाषेतून जनमानसात पोहोचवणे आपली जबाबदारी आहे.”

 

प्रा. स्वाती कराड – चाटे म्हणाल्या,”संत साहित्याच्या विचारांतून आपल्याला ‘तीर्थक्षेत्रांकडून ज्ञानतीर्थ क्षेत्रांकडे’ वाटचाल करायची आहे. आज विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण होण्यासाठी संत साहित्याचा शिक्षणात समावेश झाला पाहिजे.”

 

आळंदीतील फ्रुटवाले धर्मशाळा येथे आयोजित १७ व्या नांदी संमेलनाची सुरुवात माऊलींच्या मंदिरापासून काढण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीने झाली. दुपारी हभप गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्री भजन झाले. ‘तीर्थक्षेत्राचे ज्ञानतीर्थ क्षेत्रात परिवर्तन’ या विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली हभप यशोधन महाराज साखरे, हभप बापूसाहेब मोरे आणि सचिन परब यांचे विचार मंथन झाले. अखेरीस डॉ. समीरा गुजर आणि डॉ. मधुरा वेलणकर यांचा ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतुल कुलकर्णी यांनी केले. डॉ. महेश थोरवे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments