Friday, October 30, 2026
Google search engine
HomeUncategorized*अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा सादर*

*अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा सादर*

 

 

*दुष्काळ व पाणीटंचाईची शक्यता असलेल्या भागात जलसंधारण कामांना गती*

 

पुणे, दि. ३०: टंचाईग्रस्त व दुष्काळी भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती आणि उपलब्ध जलस्रोतांचा तांत्रिक अभ्यास करून केवळ तात्पुरती टँकर मुक्ती न करता गावांना शाश्वत जलसमृद्धीकडे घेऊन जाणारा आराखडा जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून तयार करण्यात आला आहे.

 

जिल्ह्यातील जलसंधारण प्रकल्प पाझर तलाव व बंधाऱ्यांची दुरुस्ती करून उपलब्ध पाणीसाठा आणि सिंचनक क्षमता पुनर स्थापित करण्याच्या उद्देशाने दुष्काळ व पाणीटंचाईची शक्यता असलेल्या भागात जलसंधारण कामांना गती देण्यात आली असून दुष्काळ निवारण आराखडा वेळेत आणि गुणवत्तेसह पूर्ण करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे.

 

पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे आणि भूजल पातळीत वाढ करणे, विकेंद्रीत जलसाठे निर्माण करून ग्रामीण भागातील शेतीसाठी संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे व टंचाईग्रस्त आणि पाण्याच्या अतिवापरामुळे भूजल पातळी खालावलेल्या गावांना टँकरमुक्त व जलसमृद्ध करण्याच्या उद्देशाने प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

 

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत धरणे व जलसाठ्यांमधील गाळ काढून साठवण क्षमता वाढविणे आणि काढलेला गाळ शेतात पसरवून जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी मदत होते. या अभियानांतर्गत पात्र शेतकऱ्यांना गाळ वाहतुकीसाठी प्रति घनमीटर रुपये ३४.७५ प्रमाणे अनुदान देण्यात येते. एका एकरासाठी कमाल १५ हजार रुपये व दोन एकरासाठी कमाल ३० हजार ५०० रुपये पर्यंत मदत देण्यात येते. या अभियानांतर्गत २११ कामे प्रस्तावित आहेत.

 

या अभियानांतर्गत अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, विधवा, दिव्यांग व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. जलसाठ्याची माहिती, गाळाचे प्रमाण, शेतकरी व कामाची माहिती तसेच कामापूर्वी आणि कामानंतरचे छायाचित्र, व्हिडिओ अवनी ॲपवर नोंदविणे आवश्यक आहे.

 

एलनिनोच्या पार्श्वभूमी वरती ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत जलसाठ्यांमधील असलेल्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पाझर तलाव, वळण बंधारे गाव तलाव, साठवन बंधारे यांचे दुरुस्तीची कामं हाती घेण्यासाठी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने आराखडा करून जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्तावित करण्यात आलेला आहे. ही कामे वेळेत मंजूर होऊन दुरुस्त झाल्यास पुढील येणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवणे व तो जमिनीत जिरवणे शक्य होईल व पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करता येईल, असे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव बोरकर यांनी सांगितले

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments