Saturday, November 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedलहान मुलांना भारतीय संस्कृतीशी जोडणे गरजेचे डॉ. नितीन करमाळकर यांचे मत...

लहान मुलांना भारतीय संस्कृतीशी जोडणे गरजेचे डॉ. नितीन करमाळकर यांचे मत : डॉ. भूषण पटवर्धन लिखित ‘काऊ फॉर चिल्ड्रन’ पुस्तकाचे प्रकाशन

 

 

पुणे : भारतीय सण-उत्सव केवळ एक कार्य म्हणून साजरे न करता, त्यामागील उद्दिष्ट, परंपरा आणि संस्कार लहान मुलांना समजावून सांगणे गरजेचे आहे. सण-उत्सवांमागील शास्त्रीय, वैज्ञानिक आणि सामाजिक महत्त्व मुलांना समजले, तर भारतीय संस्कृतीची मुळे त्यांच्या मनात अधिक खोलवर रुजतील. आजच्या काळात लहान मुलांना भारतीय संस्कृतीशी जोडण्याची गरज असून, डॉ. भूषण पटवर्धन यांच्या पुस्तकातून हे महत्त्वाचे कार्य होऊ शकेल, असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी व्यक्त केला.

 

कोंढवा येथील इस्कॉन मंदिरात डॉ. भूषण पटवर्धन लिखित ‘काऊ फॉर चिल्ड्रन’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नितीन करमाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य संजय भोसले, इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष रेवतीपती प्रभू, सर्वलक्षण प्रभू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाचे हरीश नवले, जनार्दन चितोडे, भक्तिवेदांत संशोधन केंद्राचे बलभद्र कृपा प्रभू आणि संचालक के एन धुमाळ आदी उपस्थित होते.

 

डॉ. नितीन करमाळकर म्हणाले, भारतीय सण-उत्सव साजरे करताना ते नेमके कशासाठी साजरे केले जातात, त्यामागील उद्दिष्ट काय आहे, तसेच त्यांचे शास्त्रीय, वैज्ञानिक आणि सामाजिक महत्त्व काय आहे, हे मुलांना समजावून सांगितले पाहिजे. बालवयात मिळालेले हे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर ठसतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावरही होतो. याच प्रेरणेतून डॉ. भूषण पटवर्धन यांनी गोमातेचे महत्त्व लहान मुलांना समजावे, या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे.

 

डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, भारतीय समाजाने गाईला कधीही केवळ पशू मानले नाही, तर तिला कायम आपल्या कुटुंबाचा एक भाग मानले आहे. भारतीय संस्कृतीने गाईला गोमातेचा दर्जा दिला आहे. गाईचे वैज्ञानिक, सामाजिक आणि अन्य विविध अंगांनी असलेले महत्त्व लहान मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत या पुस्तकातून मांडले आहे. लहान वयातच मुलांना गाईचे महत्त्व समजले, तरच ती भारतीय संस्कृतीचे संवर्धन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे करू शकतील.

 

संजय भोसले म्हणाले, लहान मुलांना गाईचे महत्त्व समजावे यासाठी शाळांमध्ये गो-पर्यटन ही संकल्पना राबवली पाहिजे. त्याद्वारे मुलांना गोशाळांना भेट देऊन गाईचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता येईल. तसेच मंदिर तिथे गोशाळा ही संकल्पना राबवल्यास भारतीय संस्कृतीत उच्च स्थान असलेल्या गोमातेचे संरक्षण होण्यासह संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होण्यासही मदत होईल.

 

जनार्दन चितोडे म्हणाले, डॉ. भूषण पटवर्धन यांच्या या पुस्तकामुळे लहान मुले भारतीय संस्कृतीशी जोडली जातील. आज मोबाईल, व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या युगात मुलांचे लक्ष डिजिटल माध्यमांकडे अधिक आकर्षित झाले आहे. त्यामुळे त्यांचे भारतीय संस्कृतीकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. मुलांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देऊन तिचे संवर्धन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे करण्यासाठी प्रेरित करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

 

या प्रकाशना निमित्त पॅनेल चर्चेसाठी डॉ. एस. बी. मुजुमदार यांची नात अमृता (येरवडेकर) रुईकर, प्रवीण मसालेचे राजकुमार चोरडिया यांचे पुत्र आनंद चोरडिया, चितळे बंधूचे राजाभाऊ चितळे यांचे नातू इंद्रनील चितळे, संतूर वादक धनंजय दैठणकर यांचे पुत्र निनाद दैठणकर, डॉ. जी. आर. एकबोटे यांची कन्या निवेदिता एकबोटे, भारती विद्यापीठाचे डॉ. शिवाजीराव कदम यांचे पुत्र राहुल कदम, डॉ. सुरेशचंद्र भोसले यांचे पुत्र चिन्मय भोसले, चाणक्य मंडळाचे डॉ. अविनाश धर्माधिकारी यांचे पुत्र सिद्धार्थ धर्माधिकारी, भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे डॉ. एस. पी. सरदेशमुख यांचे पुत्र सुकुमार सरदेशमुख आणि पर्पल मोबिलिटी सोल्युशन्सचे प्रसन्न पटवर्धन यांचे पुत्र सौरभ पटवर्धन उपस्थित होते. जनार्दन चितोडे यांनी सूत्रसंचालन केले आणि हरीश नवले यांनी आभार मानले.

 

——————————————–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments