पुणे : दीपावलीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकाशकंदिलांची पुष्पआरास करण्यात आली आहे. फुलांच्या सजावटीमध्ये साकारलेले हे आकाशकंदिल भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दिपावलीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळा तर्फे दीपावलीनिमित्त मंदिरात आकर्षक आरास करण्यात आली असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली.
ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, वसुबारसेपासून सुरु झालेल्या दीपावलीच्या मंगलमय पर्वाची सांगता तुळशीविवाह सोहळ्याने संपन्न होते. त्यामुळे मंदिरात दीपोत्सव, अन्नकोट यांसह धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. तसेच मंदिराला आकर्षक आरास देखील करण्यात येते. भाविकांसाठी स्वहस्ते अभिषेकाची सुविधाही उपलब्ध असल्याने अनेक भाविक या मंगलपर्वात श्रीं ना अभिषेक करीत नतमस्तक होतात.


