पिंपरी, १२ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै २०२६ रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना पिंपरी येथील यशवंतनगरमधील एसआरए प्रकल्पांतर्गत महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आला आहे.
या आदेशात म्हटले आहे की, ५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या मान्यताप्राप्त प्रस्तावानुसार, एकूण ९ पैकी ८ मृत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना मोफत सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये दिवंगत राहुल धोंडिबा गायकवाड यांच्या पत्नी अश्विनी राहुल गायकवाड, दिवंगत महेश सुरेश कुंभार यांच्या पत्नी शिवुबाई महेश कुंभार, दिवंगत अक्षय राजू सावंत यांच्या पत्नी हर्षदा सुरेश बने, दिवंगत वामन दगडू कसबे यांच्या पत्नी सुनीता वामन कसबे, दिवंगत सनी अशोक माने यांच्या पत्नी कांचन सनी माने, दिवंगत सुनील भारत कोरके यांच्या पत्नी पल्लवी सुनील कोरके, दिवंगत भावेश मोहन वाणी यांच्या पत्नी मोहिनी भावेश वाणी, तर दिवंगत रणजित जयवंत पाटील यांच्या आई छाया जयवंत पाटील यांचा समावेश आहे.
तर दुर्घटनेतील मृत नागेश गायकवाड यांच्या कायदेशीर वारसांच्या कागदपत्रांची पूर्तता अद्याप झालेली नाही. संबंधितांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना सदनिका वाटप करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोफत सदनिका देण्याबाबत मा. महापालिका सभेने दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजीच्या ठरावानुसार मान्यता दिली होती. त्यानंतर तातडीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाने मोफत सदनिका देण्याबाबत कार्यवाही सुरू केली होती. त्यानुसार आता पिंपरी येथील यशवंतनगरमधील एसआरए प्रकल्पात या आठ सदनिका उपलब्ध करून देण्याबाबतचा आदेश आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे दुर्घटनेत कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला गमावलेल्या कुटुंबांना निवाऱ्याचा कायमस्वरूपी आधार मिळणार आहे.
महापालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षिततेचा आधार मिळणार असून, त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे.
….
वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याबाबतचा ठराव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महापालिका सभेने केला होता. त्यानंतर तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करून त्याचे वाटपही करण्यात आले. आता मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोफत सदनिका उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली असून, यशवंतनगरमधील एसआरए प्रकल्पात यासाठी ८ सदनिकादेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
……..
कोट
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाची महापालिका प्रशासनाला पूर्ण जाणीव आहे. या कठीण प्रसंगी महापालिका प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसोबतच हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका संवेदनशील असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
…..
कोट
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ९ कर्मचाऱ्यांच्या वारसांना सदनिका देण्यात येणार आहेत. त्यापैकी एका कर्मचाऱ्याच्या वारसा कडून अद्याप कागदपत्र पूर्तता केली नाही. त्यामुळे सध्या ८ सदनिका वाटप आदेश करण्यात आले आहेत. या ८ सदनिका यशवंतनगर येथील एसआरए प्रकल्पात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना सदनिकांचा ताबा देण्यात येईल. यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
— अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


