Sunday, November 15, 2026
Google search engine
HomeUncategorized*भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष, त्याग आणि स्वाभिमानाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे...

*भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष, त्याग आणि स्वाभिमानाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*

 

 

*आदिवासी संस्कृती, परंपरा आणि खाद्यसंस्कृतीच्या जतनासाठी शासन कटिबद्ध*

 

*घोडेगाव येथे रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवाचे उद्घाटन*

 

पुणे, दि. १५ : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या जनजातीय गौरव दिनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमानाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत आहे. आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासह त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव यांच्या वतीने

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिन कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आदिवासी रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला आमदार शरद सोनवणे, आमदार बाबाजी काळे, खेड पंचायत समितीच्या सभापती गौरीताई मुऱ्हे, उपसभापती दिलीप डुबे, ॲड. किरण गभाले, जनजाती सल्लागार समितीचे सदस्य तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगावचे प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

**भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष प्रेरणादायी**

धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांना अवघ्या २५ वर्षांचे आयुष्य लाभले; मात्र इतक्या कमी वयात किती मोठे कार्य उभे करता येते, हे त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले. ब्रिटिश सत्ता, सावकारी आणि जमीनदारी व्यवस्थेला आव्हान देत त्यांनी ऐतिहासिक ‘उलगुलान’ घडवले. हा केवळ इंग्रजांविरोधातील उठाव नव्हता, तर आपल्या हक्कांसाठी, जमिनीसाठी, अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी उभारलेला बुलंद आवाज होता. त्यांच्या संघर्षाचा आणि त्यागाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

 

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. खानदेश आणि सातपुड्यातील भिल्ल बांधवांनी इंग्रजांच्या जुलमाविरोधात पुकारलेला लढा, राघोजी भांगरे आणि रामजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली महादेव कोळी समाजाने केलेला उठाव, तसेच वीर बाबुराव शेडमाके यांनी गोंड वीरांची फौज उभारून ब्रिटिशांना दिलेली झुंज हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे. अन्यायाविरोधात धैर्याने उभे राहिलेल्या या सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिवीरांना त्यांनी अभिवादन केले.

 

**आदिवासी संस्कृतीचा वारसा देशासमोर आणणार**

जनजातीय गौरव दिनानिमित्त राज्यात संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून आदिवासी समाजाची लोकनृत्ये, लोकसंगीत, हस्तकला, वेशभूषा आणि जीवनशैली संपूर्ण देशासमोर येणार आहे. पूर्वजांनी जपलेला हा समृद्ध सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमांमधून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

शेती, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात काम केल्यामुळे निसर्गाशी जोडलेल्या जीवनपद्धतीचे महत्त्व जवळून अनुभवले आहे. जल, जमीन आणि जंगलाशी नाते जोडून जगणाऱ्या आदिवासी समाजाकडूनच पर्यावरणप्रेमाची खरी ऊर्जा मिळाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

 

**शेवटच्या आदिवासी पाड्यापर्यंत विकास पोहोचविणार**

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करणारा शिव- शाहू- फुले- आंबेडकरांचा सर्वसमावेशक विचार ही महाराष्ट्राची ओळख आहे. विकासाचा लाभ प्रत्येक गाव, वाडी आणि पाड्यापर्यंत पोहोचला पाहिजे, ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची शिकवण होती. स्वर्गीय अजितदादांनीही आयुष्यभर याच विचाराने काम केले. हाच वारसा पुढे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगावच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण, आदिवासी सेवक पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि पारधी मेळाव्यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हे उपक्रम आदिवासी समाजाच्या विकासाला चालना देणारे आणि कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

 

**पारंपरिक खाद्यसंस्कृतीला बाजारपेठ उपलब्ध होणार**

आदिवासी संस्कृतीची ओळख करून देणारा रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सव आरोग्य आणि पौष्टिक आहाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. पारंपरिक रानभाज्या आणि खाद्यपदार्थांना आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही विशेष महत्त्व आहे. अशा महोत्सवांमुळे पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन आणि संवर्धन होण्याबरोबरच या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होऊन स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन मिळेल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

 

पुणे जिल्ह्याची पालकमंत्री या नात्याने आदिवासी भागातील शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध राहील. पारधी समाजासह सर्व आदिवासी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून सहभागी कलावंत आणि आदिवासी बांधवांचे त्यांनी कौतुक केले. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वसा आणि संघर्षाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प सर्वांनी करावा. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचा गौरव सर्वदूर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments