Sunday, November 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedकंधारमध्ये ७ वे छत्रपती शिवाजी मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न ...

कंधारमध्ये ७ वे छत्रपती शिवाजी मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न दुष्काळावर मात करण्यासाठी शिवरायांचे कृषी आणि लोककल्याणकारी धोरणच मार्गदर्शक : संमेलनात सूर

 

 

कंधार, नांदेड :

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ७ वे छत्रपती शिवाजी महाराज मराठी साहित्य संमेलन कंधार (नांदेड) येथे मोठ्या उत्साहात पार पडले. संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिका आरती झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि महामानवांच्या प्रतिमा पूजनाने संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला.

या संमेलनाचे निमंत्रक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे होते. प्रमुख उपस्थितींमध्ये उदगीरचे माजी आमदार गोविंद केंद्रे, कंधारचे माजी आमदार रोहिदास चव्हाण, कंधारचे नगराध्यक्ष शहाजीराजे नळगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबुराव केंद्रे, साहित्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष व स्वागताध्यक्ष भास्कर गिते, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष परमेश्वर पालकर, नांदेड विभागीय अध्यक्ष मारोती कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांना छत्रपती शिवाजी महाराज शिक्षणरत्न जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिक शिवा प्रधान यांना छत्रपती शिवाजी महाराज साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार तर विक्रम मालन आप्पासो शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराज युवा साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

देशभरातील शंभरहून अधिक साहित्यिकांनी या संमेलनात सहभाग नोंदवला. मोठ्या संख्येने साहित्यिक, रसिक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामाजिक कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.

 

निमंत्रक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांचे भाषण सामाजिक, ऐतिहासिक आणि लोकाभिमुख ठरले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा केवळ इतिहास म्हणून नव्हे, तर आजच्या प्रश्नांवरचे उत्तर म्हणून अर्थ लावला.

 

डॉ.शरद गोरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :

शिवराय हे रयतेचे राजे : शिवाजी महाराजांनी कधीही स्वतःसाठी राज्य केले नाही. शेतकऱ्याचे पीक, स्त्रीची अब्रू आणि सामान्य माणसाचा सन्मान हाच त्यांच्या राज्याचा केंद्रबिंदू होता. आजच्या राज्यकर्त्यांनीही हीच भूमिका घ्यायला हवी.

कृषी धोरण आजही मार्गदर्शक : शिवरायांनी शेतसारा पद्धत शेतकऱ्याला परवडेल अशी ठेवली. दुष्काळात सारा माफ करणे, बियाणे देणे, शेतकऱ्याला कर्जातून बाहेर काढणे हे त्यांचे धोरण होते. आजच्या दुष्काळात शेतकऱ्याला कर्जमाफीपेक्षा शाश्वत पाणी, हमीभाव आणि सन्मानाची गरज आहे.

जलव्यवस्थापनाचा वारसा : किल्ल्यांवर टाकी, तलाव, पाझर तलाव आणि गावोगावी विहिरी बांधण्याची दूरदृष्टी शिवरायांकडे होती. कंधारसारख्या दुष्काळी भागात आजही पाणी अडवा, पाणी जिरवा हाच मंत्र कामी येईल.

सामाजिक समता आणि सर्वधर्म समभाव : शिवाजी महाराजांनी सर्व जाती, धर्माच्या लोकांना स्वराज्यात स्थान दिले. स्त्रियांना सन्मान, मुस्लिम सरदारांना विश्वासाचे स्थान आणि सर्व समाजाला न्याय दिला. आज समाजात तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींना हेच उत्तर आहे.

आरोग्य आणि शिक्षण ही खरी संपत्ती : केवळ इमारती नव्हे, तर माणूस घडवणे हे खरे शिक्षण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. कंधारसारख्या तालुक्यातूनही गुणवंत घडू शकतात, यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा.

 

डॉ. गोरे यांच्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. कंधारच्या भूमीत शिवरायांच्या विचारांचा हा जागर दुष्काळातही आशेचा किरण ठरेल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. उद्घाटन सत्रात भास्कर गीते लिखित अवकाळी पाऊस आणि शाहूबाई गीते लिखित सुकलेला मळा व ओव्या गाऊ आनंदाने या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुप्रसिद्ध कवयित्री प्रमोदिनी किन्नाके यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले आपल्या बहारदार रचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या संमेलनाचे सूत्रसंचालन वर्षा मुस्केवाड यांनी केले. आभार परमेश्वर पालकर यांनी मानले.

 

संमेलनाध्यक्षा भाषणाची चौकट : “साहित्याने समाजाला दिशा द्यावी.

संमेलनाध्यक्ष आरती झोटिंग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.

शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले, तसे साहित्यिकांनी रयतेचे साहित्य निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले. आजची मराठी भाषा, ग्रामीण साहित्य, स्त्री साहित्य आणि युवा साहित्यिकांची भूमिका यावर त्यांनी सखोल विचार मांडले. साहित्याने जात, धर्म, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा धर्म जपला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.”

— आरती झोटिंग

संमेलनाध्यक्षा, ७ वे छत्रपती शिवाजी महाराज मराठी साहित्य संमेलन, कंधार (नांदेड)

 

 

– अधिक माहितीसाठी

प्रसिद्धी विभाग,

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे, भारत.

7743884307

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments