*पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये दुचाकी वाहनांची नवीन मालिका सुरू; पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन*
पुणे, दि. १६ (जिमाका वृत्तसेवा) : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड (मोशी) येथे दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक विहित शुल्काच्या तीनपट शुल्क भरून आरक्षित करण्यासाठी चारचाकी वाहनधारकांनी १८ नोव्हेंबर रोजी, तर दुचाकी वाहनधारकांनी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.
अर्जासोबत डीडी, आधारकार्ड, पत्त्याचा पुरावा, फोटो ओळखपत्र व पॅनकार्ड यांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. डीडी ‘DY. R.T.O. PIMPRI CHINCHWAD’ यांच्या नावे राष्ट्रीयीकृत अथवा अनुसूचित बँकेचा असावा.
चारचाकी वाहनांच्या आकर्षक क्रमांकांची यादी १९ नोव्हेंबर रोजी, तर दुचाकी वाहनांची यादी २० नोव्हेंबर रोजी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. पसंतीच्या क्रमांकासाठी अतिरिक्त रकमेचा डीडी सीलबंद पाकिटात संबंधित दिवशी दुपारी २.३० वाजेपर्यंत जमा करावा. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता लिलाव प्रक्रिया पार पडेल. सर्वाधिक रकमेचा डीडी सादर करणाऱ्या अर्जदारास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल.
आरक्षित क्रमांकाच्या मोबाईल संदेशानंतर पाचव्या दिवशी कार्यालयातून पावती घ्यावी. आरक्षित क्रमांक १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी वापरणे बंधनकारक असून, मुदतीत वाहन सादर न केल्यास आरक्षण रद्द होईल. भरलेले शुल्क परत मिळणार नाही, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
000000


