पुणे, 17 नोव्हेंबर 2026: बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी यांच्या वतीने आयोजित आयडीबीआय बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी करंडक 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत शहरातून 8संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा सहकारनगर येथील शाहू कॉलेज क्रिकेट मैदानावर 19 नोव्हेंबर 2026 पासून रंगणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक उत्कर्ष अग्रवाल यांनी सांगितले की, “19 वर्षांखालील गटातील होतकरू क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी आणि स्पर्धात्मक सामन्यांचा अनुभव मिळवून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशा स्पर्धांमुळे युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते तसेच भविष्यातील क्रिकेटपटू घडविण्यास मदत होते. पुण्यातील संघांचा मिळालेला प्रतिसाद पाहता ही स्पर्धा निश्चितच चुरशीची आणि रंगतदार होईल, असा आम्हाला विश्वास आहे.” स्पर्धेला आयडीबीआय बँकेचे प्रायोजकत्व लाभले आहे.
स्पर्धेत केदार जाधव क्रिकेट अकादमी अ, केदार जाधव क्रिकेट अकादमी ब, क्रिकबेसिक्स, वेंगसरकर क्रिकेट अकादमी, वायएमसीए, सहारा क्रिकेट अकादमी आणि विजय क्रिकेट अकादमी हे 8 संघ झुंजनार आहेत. तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने दिवसा व रात्री खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेचे सामने 50षटकांचे होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या संघाला करंडक, पदक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, सामनावीर यांना आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे अग्रवाल यांनी नमूद
केले.


