**गणना अर्ज पुन्हा सादर करता येणार; भारत निवडणूक आयोगाचे निर्देश**
पुणे, दि. २० (जिमाका वृत्तसेवा) : विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान अनुपस्थित, स्थलांतरित, मृत अथवा दुबार (ASDD) म्हणून नोंद झाल्यामुळे ज्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत, अशा मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. संबंधित मतदारांना पुन्हा गणना अर्ज सादर करता येणार असून, यासाठी निवडणूक यंत्रणेने विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
या निर्णयानुसार, अनुपस्थित, स्थलांतरित, मृत अथवा दुबार म्हणून नोंद झालेल्या आणि ज्यांचे गणना अर्ज प्राप्त झाले नव्हते, अशा मतदारांच्या मतदान केंद्रनिहाय याद्या पुन्हा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. संबंधित मतदान केंद्रांचे सूचना फलक, ग्रामपंचायत भवन, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच गटविकास अधिकारी आणि पंचायत अधिकारी यांच्या कार्यालयांत या याद्या लावण्यात येतील. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावरही त्या वाचता येण्याजोग्या पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट न होण्याची संभाव्य कारणेही त्यामध्ये नमूद केली जाणार आहेत.
संबंधित मतदारांना त्यांच्या सध्याच्या निवासस्थानाच्या कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे भरलेले गणना अर्ज सादर करता येतील. यासाठी निवडणूक आयोगाच्या ईसीआयनेट (ECINET) प्रणालीमध्ये संबंधित मतदारांचे अंशतः भरलेले गणना अर्ज नव्याने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (BLO) माध्यमातून संबंधित मतदारांशी संपर्क साधून प्रत्यक्ष किंवा व्हॉट्सॲप, ई-मेल, लघुसंदेश अशा इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून अर्ज पोहोचवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. मतदारांना पूर्वीच्या मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या (EPIC) आधारे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून किंवा ईसीआयनेट ॲपद्वारे अर्ज उतरवून भरता येणार आहे.
यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या समन्वयाने घरोघरी भेटी देऊन संबंधित मतदारांचा शोध घ्यावा. शेजारी, कुटुंबीय आणि रहिवासी संघटनांकडे चौकशी करावी. उपलब्ध संपर्क क्रमांकांच्या माध्यमातूनही मतदारांशी संपर्क साधून त्यांना अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांची माहिती द्यावी.
ज्या मतदारांनी आपले निवासस्थान बदललेले नाही, त्यांना भरलेला व स्वाक्षरी केलेला गणना अर्ज, यापूर्वी अर्ज सादर न करण्याचे कारण नमूद केलेल्या विहित विवरणपत्रासह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे स्वतः अथवा कुटुंबीयांमार्फत सादर करता येईल. ईसीआयनेट प्रणालीवर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीसह ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
राज्यातील अन्य विधानसभा मतदारसंघात स्थलांतरित झालेल्या मतदारांना नव्याने नमुना अर्ज क्रमांक ८ भरण्याची आवश्यकता नाही. अशा मतदारांनी नवीन पत्ता आणि विधानसभा मतदारसंघाची माहिती नमूद केलेला गणना अर्ज, विहित विवरणपत्र आणि पत्त्याचा पुरावा संबंधित मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे सादर करावा. नव्या ठिकाणच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचीही मदत घेता येणार आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आणि ईसीआयनेट ॲपवर ‘बूथस्तरीय अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यासाठी दूरध्वनीची वेळ निश्चित करा’ (Book a Call with BLO) ही सुविधा उपलब्ध आहे. बेघर व्यक्तींकडे निवासाचा कोणताही दस्तऐवज नसल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याचा प्रत्यक्ष पडताळणी अहवाल पत्त्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
प्राप्त झालेल्या सर्व गणना अर्जांवर मतदार नोंदणी नियम, १९६० मधील नियम २१(१) नुसार कार्यवाही करण्यात येईल. यामध्ये संबंधित मतदाराची पात्रता, सामान्य निवासस्थान आणि अन्य आवश्यक तपशीलांची पडताळणी केली जाणार आहे. पडताळणीनंतर स्वीकारलेले अर्ज सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी स्वतंत्रपणे ठेवण्यात येतील. अशा मतदारांना यापूर्वी देण्यात आलेलाच मतदार ओळखपत्र क्रमांक पुन्हा देण्यात येणार आहे.
विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान नव्याने मतदार नोंदणीसाठी नमुना अर्ज क्रमांक ६ यापूर्वीच सादर केलेल्या मतदारांना पुन्हा गणना अर्ज आणि विवरणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या अर्जांवर ३ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
या निर्णयाची माहिती सर्व संबंधित मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमे, राष्ट्रीय व स्थानिक भाषांतील वृत्तपत्रे, अधिकृत संकेतस्थळे, ध्वनिक्षेपकाद्वारे सार्वजनिक घोषणा आणि अन्य उपलब्ध माध्यमांतून व्यापक प्रसिद्धी देण्याचे निर्देश आयोगाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा उभारून कोणताही पात्र मतदार अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्याच्या संधीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर दुबार मतदार नोंदणी होणार नाही, याचीही काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


