*पुणे जिल्ह्यातील १६ हजार १७९ शेतकरी एकरकमी कर्जफेड योजनेसाठी पात्र*
पुणे, दि. २० : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एकरकमी समझोता (ओटीएस) योजनेसाठी पुणे जिल्ह्यातील १६ हजार १७९ शेतकरी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये १३ हजार ७५० शेतकरी जिल्हा बँकेचे, तर २ हजार ४२९ शेतकरी व्यापारी बँकांचे आहेत. पात्र शेतकऱ्यांनी यादीतील तपशील तपासून कर्जाच्या दोन लाख रुपयांवरील स्वतःच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत ३१ मार्च २०२७ पर्यंत जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ सुरू केली आहे. या योजनेमध्ये कर्जमाफी, एकरकमी समझोता आणि प्रोत्साहन असे तीन घटक आहेत. पहिल्या टप्प्यात कर्जमाफी घटकाची अंमलबजावणी करण्यात आली असून, आतापर्यंत २५ लाख ८१ हजार शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यापैकी आधार प्रमाणीकरण केलेल्या २० लाख ७२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर १८ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे.
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एकरकमी समझोता घटकांतर्गत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जाची थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची अतिरिक्त रक्कम बँकेत भरल्यानंतर दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यासाठी बँकांकडील माहितीचे संगणकीय संस्करण करून राज्यभरातील १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
*बँकनिहाय यादी तपासून रक्कम जमा करण्याचे आवाहन*
पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्थांच्या शाखा आणि ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, बँक कर्जखात्याचा तपशील, ३१ मार्च २०२६ अखेरची थकबाकी, एकरकमी समझोता योजनेनुसार थकबाकीची रक्कम, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आणि शासनामार्फत देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कम नमूद करून यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी प्रसिद्ध झालेल्या यादीतील तपशील काळजीपूर्वक तपासून स्वतःच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करावी. एकाच बँकेत एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम कोणत्याही एका कर्जखात्यात जमा करण्याची सुविधा आहे. मात्र, संबंधित खात्यासाठी योजनेनुसार निश्चित केलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा करू नये. याबाबत बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे.
शेतकऱ्यांनी रक्कम जमा केल्यानंतर संबंधित बँकेकडून त्याची माहिती पोर्टलवर अद्ययावत केली जाणार आहे. ही माहिती अद्ययावत झाल्यानंतर तीन दिवसांनी संबंधित शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध होईल.
*ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण आवश्यक*
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करणे आवश्यक आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरण आणि बँकेत स्वतःच्या हिश्श्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्रतेनुसार दोन लाख रुपयांचा लाभ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येईल. शासनाकडून ही रक्कम जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल.
एकरकमी समझोता योजनेअंतर्गत प्रसिद्ध झालेली ही पहिली यादी असून, बँकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीचे संगणकीय संस्करण करून पुढील पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून योजनेची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००


