Friday, November 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedबालसंसदेतील विद्यार्थ्यांनी मांडलेले प्रश्न संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचवून सोडविणार – महिला व बालविकास...

बालसंसदेतील विद्यार्थ्यांनी मांडलेले प्रश्न संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचवून सोडविणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे*

 

 

**बालकांमध्ये सामाजिक व राजकीय जाणीव निर्माण होणे महत्त्वाचे; बालसंसदेतून नव्या पिढीची वैचारिक प्रगल्भता अधोरेखित*

 

**बालसंसदेत विद्यार्थ्यांनी सांभाळली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची भूमिका*

 

पुणे, दि. २० : बालसंसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मांडलेले प्रश्न केवळ प्रातिनिधिक स्वरूपात न ठेवता ते संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचवून सोडविण्यासाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

 

बालसंसदेत अत्यंत अभ्यासपूर्ण, आत्मविश्वासाने आणि प्रगल्भतेने विविध सामाजिक प्रश्न मांडले असून, नव्या पिढीची सामाजिक आणि लोकशाहीविषयक जाणीव या उपक्रमातून प्रकर्षाने दिसून आली, असेही त्यांनी सांगितले.

 

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे ‘विकसित महाराष्ट्र @ २०४७’ च्या उभारणीत बालकांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘माझे हक्क, माझा आवाज… विकसित महाराष्ट्राचा ध्यास!’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, यशदा, पुणे आणि संयुक्त राष्ट्र बाल निधी (युनिसेफ) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘बाल संसद २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मंत्री तटकरे बोलत होत्या. यावेळी राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक, सदस्य गितांजली बुटी, अतुल देसाई, प्रविण भुजाडे, सदस्य सचिव वंदना जैन, यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.

 

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, आजच्या बालसंसदेत विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विरोधी पक्षनेते आणि विधानसभा सदस्यांच्या भूमिका अत्यंत प्रभावीपणे पार पाडल्या. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यामागील अभ्यास पाहता ही पिढी अत्यंत जागरूक, हुशार आणि प्रगल्भ असल्याचे जाणवले. आधीची पिढी संघर्षातून अधिक अनुभवसंपन्न झाली, तर पुढची पिढी अधिक चतुर आणि तंत्रज्ञानस्नेही होत आहे. या नव्या पिढीतील उत्साह आणि क्षमता योग्य दिशेने वळविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.

 

बालसंसदेत विद्यार्थ्यांनी शाळेतील मैदान, क्रीडा सुविधा, अंगणवाड्या, प्रशिक्षण तसेच महिला लोकप्रतिनिधींचे सक्षमीकरण अशा विविध विषयांवर प्रश्न मांडले. महिला लोकप्रतिनिधींना विभागनिहाय प्रशिक्षण दिल्यास त्या कारभार अधिक सक्षमपणे सांभाळू शकतील. यशदाच्या माध्यमातून अशा प्रशिक्षण उपक्रमांना चालना देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

बालसंसदेत मांडण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नाची नोंद घेण्यात आली आहे. बालहक्क आयोगाच्या माध्यमातून संबंधित विद्यार्थ्यांच्या नावाने हे प्रश्न लेखी स्वरूपात प्राप्त झाल्यास ते संबंधित पालकमंत्री आणि सबंधित विभागीय मंत्र्यांकडे पाठविण्यात येतील. शाळेच्या मैदानाचा प्रश्न असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून क्रीडा सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत, तर अंगणवाडीचा प्रश्न असल्यास त्याबाबत कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

बालसंसद ही केवळ प्रातिनिधिक किंवा प्रात्यक्षिक संसद न राहता विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर प्रत्यक्ष कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रश्नांची दखल घेऊन ते सोडविण्याच्या प्रक्रियेत शासनाने सहभागी होणे हीच बालसंसदेची खरी फलश्रुती ठरेल, असे त्यांनी सांगितले.

 

बालसंसदेतील विद्यार्थ्यांनी उत्तम तयारी, आत्मविश्वास आणि लोकशाही प्रक्रियेची जाण दाखविली असून, त्यांच्या या उत्साहाचे कौतुक करून त्यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

*बालसंसदेतून बालशक्तीकडे वाटचाल करूया -महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक*

 

बालसंसद हे केवळ मुलांनी आपले विचार मांडण्याचे व्यासपीठ नसून त्यांच्या नेतृत्वगुणांना, निर्णयक्षमतेला आणि सामाजिक जाणीवांना दिशा देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. मुलांच्या मागण्या आणि बालसंसदेत झालेल्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मुख्यमंत्री तसेच संपूर्ण मंत्रिमंडळापर्यंत पोहोचविण्यात येतील. बालसंसदेच्या माध्यमातून आता बालशक्तीकडे वाटचाल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांनी केले.

 

मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी केलेली गुंतवणूक ही भारताच्या विकासासाठीची गुंतवणूक आहे. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांची (SDG) पूर्तता साधायची असेल, तर देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील मुलांच्या विकासाला प्राधान्य द्यावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

 

बालसंसदेत मुलांनी शिक्षण, आरोग्य आणि व्यसनाधीनता यांसारख्या विषयांवर मांडलेले विचार शासनाला भविष्यातील धोरणांसाठी मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

बालकांचे विचार आणि कल्पकता अनेकदा प्रौढांनाही नवी दिशा देणारी असते. त्यामुळे मुलांचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकून घेणे, त्यांच्या कल्पनांना वाव देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. सन २०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होत असताना महाराष्ट्रातील प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वप्नपूर्तीची समान संधी, सुरक्षित वातावरण आणि आनंदी जीवन मिळावे, यासाठी आजपासूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे. बालकांच्या हक्कांना आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून बालकेंद्रित महाराष्ट्र घडविण्याची आवश्यकता असल्याचे मत युनिसेफच्या प्रतिनिधी क्रिस्टिना यांनी व्यक्त केले.

 

राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील १०२ ग्रामपंचायतींचा ‘बालस्नेही पंचायत’ उपक्रमाच्या नामांकन यादीत समावेश करण्यात आला आहे. बालकांसाठी सुरक्षित, पोषक आणि विकासाभिमुख वातावरण निर्माण करण्यासह ग्रामपंचायतींच्या विकास नियोजनात त्यांच्या गरजा, समस्या आणि मतांना प्राधान्य देण्यासाठी हा उपक्रम आहे.

 

*बाल संसदेत विद्यार्थ्यांनी सांभाळली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची भूमिका*

 

राज्यस्तरीय बाल संसदेत विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कुणी मुख्यमंत्री, कुणी उपमुख्यमंत्री, तर कुणी मंत्री आणि विरोधी पक्षनेते अशा विविध जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या. या बाल संसदेत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विद्यार्थ्यांची विशेष सभा घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी मंत्री तटकरे यांना विविध विषयांवर अनेक प्रश्न विचारले. मंत्री तटकरे यांनीही प्रत्येक प्रश्नाला विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा सोप्या आणि संवादात्मक शैलीत उत्तरे दिली.

 

मिनी मंत्रालयाच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थी काही काळ प्रत्यक्ष मंत्रिमंडळ आणि संसदेच्या कामकाजात सहभागी झाल्याचा अनुभव घेऊ शकले. लोकशाही व्यवस्था, शासनाची कार्यपद्धती, लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या आणि प्रश्न मांडण्याची संसदीय पद्धत यांची ओळख विद्यार्थ्यांना या उपक्रमातून झाली. बालकांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments