पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सृजनसभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठव्या प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन करंडक स्पर्धेत धोंडू मामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजने फिरता करंडक पटकावला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सिंहगड विभागाचे संघचालक सचिन नागपुरे, संस्कार भारतीचे पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे, इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर, सृजनसभेचे होनराज मावळे उपस्थित होते.
सचिन नागपुरे म्हणाले, कोणीही एकमेकांसारखे नसते. प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. आपण स्वतःला ओळखायला शिकले पाहिजे. आपली गती कशात आहे, हे आपण ओळखायला शिकले पाहिजे. आपण भारताचे जबाबदार नागरिक बनू शकतो का, याचा विचार करायला हवा. तरच भारत विश्वगुरू बनेल. देश प्रथम या भावनेने काम करा.
चंद्रकांत घरोटे म्हणाले, कला हे असे माध्यम आहे, ज्यातून माणसाचे मन घडते आणि आपल्या जीवनाला दिशा मिळते. कलाकार जे अनुभवतो, ते व्यक्त करतो. भावी कलाकारांनी कलेच्या माध्यमातून समाजजागरण कसे करता येईल, याचा विचार करायला हवा. शिका, मोठे व्हा, यशस्वी व्हा; पण तुमचे कर्तृत्व समाजासाठी कसे उपयोगी ठरेल, यासाठी प्रयत्न असायला हवेत. काहीतरी ध्येय उराशी बाळगून समाजासाठी चांगले काम कसे करता येईल, याचा प्रयत्न करावा.
ॲड. शार्दुल जाधवर म्हणाले, आजचा हा कार्यक्रम म्हणजे तरुणांच्या सामर्थ्याचा उत्सव आहे. कलेचा आणि विचारांचा सन्मान आहे. युवकांच्या स्वप्नांना व्यासपीठ देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. हा केवळ करंडक नाही, तर विचार आणि संस्कारांचा प्रवास आहे. शिक्षण म्हणजे केवळ गुण नव्हेत. शिक्षण म्हणजे प्रश्न विचारण्याची क्षमता आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद. शिक्षण म्हणजे समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची जबाबदारी. म्हणून अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते.
छोटा ख्याल गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक वरद दलाल (भारती विद्यापीठ, कोथरूड), वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक भैरवी कोंडे (भारती विद्यापीठ), पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पूर्वा हंडावाले (धोंडू मामा साठे होमिओपॅथी कॉलेज), एकल तबला वादन स्पर्धेत प्रथम क्रमांक चैतन्य पोवार (ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), नाट्यगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पिनाक सप्रे (एमएमसीओई) आणि लोकगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक शर्वरी काशीद (बीएमसीसी) यांनी मिळविला.


