Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री जंगली महाराजांच्या पादुकांचा पालखी सोहळा शिवाजीनगर गावठाणात थाटात साजरा

श्री जंगली महाराजांच्या पादुकांचा पालखी सोहळा शिवाजीनगर गावठाणात थाटात साजरा

पुणे : ज्ञानोबा माऊली तुकाराम… च्या अखंड नामघोषासह टाळ-मृदुंगांचा गजर आणि पारंपरिक वेशातील भाविक अशा भक्तीमय वातावरणात श्री जंगली महाराजांच्या पादुकांचा पालखी सोहळा थाटात काढण्यात आला. शिवाजीनगर गावठाण येथील श्री रोकडोबा मंदिरा येथून ही मिरवणूक काढण्यात आली. कपाळी गुलाल-बुक्का लावून पादुकांचे दर्शन घेत भाविक मिरवणुकीत सहभागी झाले.

 

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने व सद््गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सव समितीच्या सहभागाने ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३४ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येतो. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. तसेच, सद््गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सव समिती व श्री सद््गुरु जंगली महाराज भजनी मंडळ यांनी देखील उत्सवात सक्रिय सहभाग घेतला आहे.

 

महाराजांच्या पादुकांची पालखी मिरवणूक श्री रोकडोबा मंदिर, शिवाजीनगर गावठाण येथून शिवाजीनगर गावठाण परिसरात काढण्यात आली. टाळ-मृदुंगांचा गजर आणि कपाळी गुलाल-बुक्का लावून भाविक मिरवणुकीत मोठया उत्साहाने सहभागी झाले होते. महाराजांच्या पादुका पालखीत ठेवण्यात आली होत्या. तर, फुलांनी पालखी सजविण्यात आली होती.

 

उत्सवात विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने झाली. तसेच संगीत सभा अंतर्गत प्रसिद्ध गायक कलाकारांची भक्तीगीते आणि संगीताचे कार्यक्रम पार पडले. विविध महिला भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम देखील उत्साहात झाले. संपूर्ण उत्सवात मंदिराला आकर्षक व भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments